सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार भांडणात आमदार बापू पठारे यांचा विषय निघाला
आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या एबी फॉर्मवर प्रत्युत्तर देताना आमदार बापू पठारे यांचा उल्लेख केला.
MLA Bapu Pathare’s name is now at the center of the political struggle : आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.
शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाची वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या ‘माझा दादा गेला’ त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत असे बोलत आहेत तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडद्याआडून सातत्याने विलिनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण करत आहेत असाही थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला.
आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दूर्देवी मृत्यू झाला याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले.
केंद्रीय उड्डाणमंत्री के रामा नायडू व मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे चौकशी सुरू केली असून ब्लॅकबॉक्सचा डेटा रिकव्हर होणारच. सुप्रिया सुळे यांनी ब्लॅकबॉक्सचा डेटा जात नाही तो रिकव्हर होतो असे वक्तव्य पुण्यात केले आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकबॉक्स आगीत न जळता तो राजकीय आगीत गेला अशाप्रकारे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले याबद्दलही नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
Bhiwandi Politics : निवडणुकांमध्ये इतरांचा गेम करणाऱ्या भाजपचा काँग्रेसने भिवंडीत केला ‘खेळ’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्या सुरू असलेल्या सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार या राजकीय संघर्षात आता आमदार बापू पठारे यांचे नाव केंद्रस्थानी आले आहे. पक्षातील विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान आणि एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या एबी फॉर्मच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना आमदार बापू पठारे यांचा उल्लेख केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विविध पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर लढलेले असताना केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परांजपे यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटले की, आमदार बापू पठारे यांच्या दोन्ही मुलांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मग त्या संदर्भात प्रश्न का विचारले जात नाहीत? हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी रोहित पवार आणि शरद पवार गटावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला.
या संपूर्ण प्रकरणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरूनही राजकीय तापमान वाढले आहे. एबी फॉर्मच्या प्रक्रियेबाबत तांत्रिक माहिती देताना परांजपे यांनी स्पष्ट केले की, ‘ए’ फॉर्मद्वारे अधिकृत पदाधिकाऱ्यांना ‘बी’ फॉर्मवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि त्यानुसारच उमेदवारांना घड्याळ चिन्ह देण्यात आले. दरम्यान, विलिनीकरणाच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापलेले असताना बापू पठारे यांचा विषय पुढे येताच हा वाद अधिकच चिघळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गटांतील संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार या संघर्षात बापू पठारे यांचे नाव पुढे येणे हे राजकीय समीकरणांना नवे वळण देणारे ठरत आहे. आगामी काळात या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
