पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदार मोहितेंच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं, एकाचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदार मोहितेंच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं, एकाचा मृत्यू

Accident Pune-Nashik Highway : आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पुणे-नाशिक महामार्गावर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. त्याचबरोबर अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दारुच्या नशेत असल्याचा आरोप

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या कार चालवत होता. त्याने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मदत केली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका टू-व्हीलरच्या कारची धडक बसली. अपघात भीषण होता. दुचाकीचा चुराडा झाला आहे, तर कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते. दरम्यान, अपघातानंतर कार चालक तिथून निघून गेल्याचंही नागरिकांनी सांगितलं आहे.

माझा पुतण्या पळून गेला नाही

माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेलं आहे. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप मोहिते पाटलांनी दिली.

जिल्हा परिषदेसाठी इच्छुक

साहेबराव मोहिते हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांचा मयूर मोहिते पाटील हा मुलगा आहे. आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनिअर असून सध्या कुटुंबाचा व्यावसाय सांभाळतो. तसंच, मयूर सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तो इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube