खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच अन् चिन्हही त्यांच्याकडेच! उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

Maharashtra Politics : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या 'त्या' याचिकेवर आज सुनावणी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देताना नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचाच गट असल्यावरही शिक्कामोर्तब केले. शिवसेनेची घटना, पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय त्यांनी दिला. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत ठाकरे यांची 2013 आणि 2018 मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील निर्णयाचे सर्व अधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घेतलेली नाही.

त्यामुळे शिवसेनेच्या 1999 च्या पक्षघटनेनुसार शिवसेनाप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांना निर्णयाचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही दोन्ही पदे वेगवेगळी असून पक्षादेश जारी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंसबृह शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिंदेंना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते. याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीचे मत म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे.

सर्व आमदारही पात्र :

त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. याबाबतचा निकाल देताना नार्वेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर 21 आणि 22 जून 2022 रोजी बोलाविलेली बैठक, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव यासंदर्भात शिंदे गटातील आमदारांना बजावलेले पक्षादेश त्यांनी न पाळल्याने अपात्र ठरविण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. तर शिंदे गटानेही आपलाच गट मूळ शिवसेना असून सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बजावलेला व्हीप ठाकरे गटातील आमदारांनी न पाळल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.

मात्र ठाकरे-शिंदे गटाकडून आमदारांना मोबाईल, व्हॉट्सअॅप, ईमेल पाठविलेले व्हीप अनेकांना मिळालेले नाहीत, शिंदेंसह काही आमदारांचे ईमेल पत्ते चुकीचे होते, ते मिळाल्याचे पुरावे योग्यप्रकारे सादर करण्यात आलेले नाहीत, तर अधिकार नसलेल्या त्रयस्थ व्यक्तींनी हे व्हीप पाठविले, अशी विविध कारणे देत नार्वेकर यांनी अपात्रतेबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे या निकालानंतर ‘शिवसेने’चे सारेच आमदार पात्र ठरले आहेत.

follow us