राज ठाकरेंची भूमिका अन् कार्यकर्ते बुचकळ्यात, मनसे प्रवक्ते महाजनांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Prakash Mahajan On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान सुरु असणाऱ्या तणावात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर प्रेम करणारे बुचकळ्यात पडले असून, अनेकांना त्यामुळे दुःख झाल्याचं मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी म्हटलं आहे. प्रकाश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने या कारवाईत पाकिस्तनामधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. मात्र यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या 15 शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यांना भारताने देखील जोरदार प्रत्युत्तर दिला होता मात्र युद्ध हा पर्याय नाही, अमेरिकेने जसे दहशतवाद्यांना शोधून ठार केलं तसं दहशतवाद्यांना संपवा, युद्दाऐवजी देशातील घुसखोरांना शोधून काढा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती मात्र आता प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसेचे अनेक कार्यकर्ते दुखावले असं म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे यांनी भारत- पाकिस्तान युद्धासंदर्भात जी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे बुचकळ्यात पडले आहेत. राजसाहेब हे नेहमीच राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते आहेत. मात्र अलीकडे त्यांनी युद्ध नको अशी भूमिका घेतली. ही भूमिका ऐकून त्यांच्यावर प्रेम करणारे समर्थक गोंधळले आणि काहींना यातून मानसिक दु:खही झाला. असं प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
चाहत्यांना मोठा धक्का, No Entry 2 मध्ये दिसणार नाही दिलजीत दोसांझ, कारण काय?
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील असा धडा शिकवणे गरजेचे होते. यावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान अगोदरच बर्बाद झालेला देश आहे त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्वीन टॉवर पाडले होते तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी दिली होती.