ठाकरे-वंचित युतीवर खासदार असदुद्दीन औवेसींनी सोडलं मौन…

ठाकरे-वंचित युतीवर खासदार असदुद्दीन औवेसींनी सोडलं मौन…

मुंबई : प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. अद्याप उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युतीबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी युती झाल्याचे संकेत मिळत आहेत. या युतीनंतर पूर्वी वंचितसोबत असलेल्या एमआयएमचे औवेसी यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

ते म्हणाले, आम्ही त्यांच्यासोबत होतो. आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश होता. देशातील वंचितांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडं प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका सोबत लढवणार आहोत, असे सांगितले आहे. शिवसेना आणि आमच्यातच बोलणी सुरू आहे. दोघांनीही एकमेकांना शब्द दिला आहे की, आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीस एकत्रितपणे सामोरं जायचं आहे आणि पुढील निवडणुका आल्या तर त्या निवडणुकाही एकत्रितपणे लढायच्या आहेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत यांच्या बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झाला असल्याची सध्याची परिस्थिती आहे.

दरम्यान, आंबेडकर-ठाकरे यांच्या युतीच्या रुपात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. आता या युतीनंतर एमआयएम पक्षाची काय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती रणनीती आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube