MPSC अभ्यासक्रम बदलला, बड्या अधिकाऱ्याच्या ‘या’ पोस्टरची का होतेय चर्चा?
पुणे : पुणे शहरात आजची सकाळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमावर जोरदार टीका करणाऱ्या फलकाच्या चर्चेने रंगली. शहरातील मुख्य भागात युवासेना सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी आणि अप्रत्यक्षरीत्या काही क्लासवर जोरदार टीका करणारे असंख्य फलक लावले आहेत. हे फलक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहेत.
याबाबत आम्ही यादव यांची भूमिका आणि उद्देश जाणून घेतला. यादव म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोगाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. समितीचे सदस्य चंद्रकांत दळवी हे होते. समितीकडून विद्यार्थी हित तसेच परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करतेवेळी समितीचे कार्यही पारदर्शक पद्धतीने असणे अपेक्षित असते. तसेच सदर सदस्य हा कोणत्याही क्लासेस, संस्था, कंपनी आदी घटकांशी बांधील नसला पाहिजे. तो सदस्य एखादी संघटना किंवा संस्था यांच्याशी बांधील असल्यास घेण्यात येणारे निर्णय हे विद्यार्थी हितासाठी नव्हे, तर संस्था हितासाठी घेण्यात येतात”. चंद्रकांत दळवी हे महाशय युनिक अकॅडमी व ज्ञानदीप अकॅडमी यांच्या पॅनलवर, प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहुन, या क्लासेसवाल्यांचे पाठबळ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रभावित करीत असल्याचे थेट दिसत आहे. त्यामुळे हा अहवाल या दोन-चार धनदांडग्या अकॅडमीशी आर्थिक हितसंबंध ठेवून तसेच त्यांच्या टोलेजंग इमारती आणि त्याचे खिसे भरण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यात कुठेही विद्यार्थी हित जोपासल्याचे दिसत नाही.
समितीचा अहवाल हा विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम बदल करताना विहित मुदतीत विद्यार्थ्यांना पूर्व सूचना देऊन अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. या व अशा बऱ्याच त्रुटी या अहवालात दिसून येतात. कोणताही अभ्यासक्रम बदल करताना विद्यार्थ्यांना त्याची पूर्वसूचना, ‘तीन ते चार वर्ष’ अगोदर दिल्याचा मागील अनुभव आहे. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यामागे, आर्थिक गौडबंगाल असल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनात सहाजिकच उपस्थित झाली आहे. या निर्णयाने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी भरडला जाणार असून तो या प्रवाहातून पूर्णतः बाजूला फेकला जाणार आहे. याला जबाबदार आयोग असणार आहे. त्यामुळे अशा आर्थिक हितसंबंधातून तयार करण्यात आलेला एक सदस्यीय समितीचा अहवाल रद्द करून सदर समिती ही बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी आहे.
आज फलक लावलेत; उद्या कोर्टात जाणार
“आता फक्त फलक लावून विद्यार्थ्यांना सत्य माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाने दिमतीला ठेवलेले अधिकारी आणि क्लास चालकांशी चालू असणारे साटेलोटे थांबले नाही, तर मात्र कोर्टात जाऊन जनहित याचिका दाखल करू. विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन पक्ष, संघटना बाजूला ठेवून आता काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणतात. तसेच मी फक्त विद्यार्थी हितासाठी सर्व पातळीवरची लढाई आता लढणार आहे आणि यासाठी रस्त्यावर उतरून पुण्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या सोबतीने हा कट मी उधळून लावणार आहे, असे कल्पेश यादव यांनी सांगितले.”