MPSC Paper Leak : ‘पुरावे द्या, राजीनाम देतो’; MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार क्लिअर बोलले…

MPSC पेपर लिक प्रकरणी विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी भूमिका स्पष्ट केलीयं.

vivek bhimanvar

MPSC Paper Leak : पुण्यात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी कथित पेपरफुटीप्रकरणी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सहभाग घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimnvar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा करणारे राजकीय आरोप होत आहेत, त्यामुळे मी व्यथित झालो असून माझ्याविरोधात कोणीही एक जरी पुरावा दिला तर एक क्षणसुद्धा मी पदावर राहणार नाही, असं ठामपणे विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केलंय. तसेच हा संपूर्ण घटनाक्रम मी आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीचा आहे. तक्रार प्राप्त होताच आयोगाकडून तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या पोलीस तपास वेगाने सुरू आहे. पेपरफुटीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तसेच, राज्य सरकारनेही उच्चाधिकार समिती गठीत केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी सल्लामसलत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सूत्रे स्वीकारल्यापासून एमपीएससीमध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा अशा एकूण 84 परीक्षा अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. निकाल जाहीर होण्यातील विलंब कमी करण्यात आला असून आता अवघ्या 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे. भविष्यात सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्यात जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे सांगत एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे भिमनवार यांनी स्पष्ट केले.

PSI परिक्षेत कॉपी झाल्याचा आरोप…
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केला आहे. विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या परीक्षेतील 615 उमेदवारांपैकी जवळपास 150 जण ‘मास कॉपी’ करून उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर या कथित गैरप्रकारासंदर्भातील काही पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

follow us