रवींद्र धंगेकर पुन्हा चर्चेत, मतदारसंघात ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोर्ड मात्र मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब

रवींद्र धंगेकर पुन्हा चर्चेत, मतदारसंघात ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोर्ड मात्र मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब

Mukhyamantri Ladli Behna Yojana : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Ladli Behna Yojana) योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

या योजनेतंर्गत महिलांना राज्य सरकार दरमहिन्याला 1500 रुपये देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यात महिला उत्सुक दिसत आहे.

तर दुसरीकडे या योजनेची क्रेझ पाहता आता विरोधकांकडून देखील आपल्या मतदारसंघात या योजनेबद्दल माहिती देणारे बोर्ड लावण्यात येत आहे. असाच एक बोर्ड सध्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडून लावण्यात आला आहे. मात्र सध्या या बोर्डवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

धंगेकर यांच्याकडून लावण्यात आलेल्या या बोर्डवर योजनेसंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. मात्र या बोर्डवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा महायुती (Mahayuti) सरकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या बोर्डवर धंगेकर यांनी स्वतःचा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो लावला आहे तर बोर्डच्या वरच्या बाजूला सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता या बोर्डवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.

आमदार धंगेकरांनी तसेच सरकारच्याच योजनेचा बोर्ड लावल्याने मोठी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून या बोर्डवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचा उल्लेख का? करण्यात आला नाही. याबाबत रवींद्र धंगेकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या लोकांना मिळणार नाही लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वांना मिळणार नाही. संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान ज्या महिलाना मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल असणे आवश्यक आहे. मात्र ज्या महिलांकडे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल त्यांच्याकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.

नगरकरांनो सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

याच बरोबर जर दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर तिच्याकडे पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तेव्हाच या योजनेत अर्ज करता येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube