मुंबईच्या पोरीनं ChatGPT ला सांगितली लव्ह स्टोरी… अन् हातावर उमटली स्वप्नातली लग्नाची मेहेंदी…
ChatGPT bridal mehendi लग्नसमारंभात अनुषाच्या मेहेंदीची सर्वत्र चर्चा झाली. उपस्थित पाहुणे वारंवार, "ही मेहेंदी डिझाइन कोणी केली?"
Mumbai woman told ChatGPT her love story It designed her bridal mehendi : तुमची लव्ह स्टोरी सांग… मी तुझ्यासाठी खास मेहेंदी डिझाइन करतो! हे वाक्य जर एखाद्या मेहेंदी कलाकाराने नव्हे, तर ChatGPT ने म्हटलं तर? ऐकायला आश्चर्य वाटेल ना?, पण मुंबईतील एका पोरीनं चॅटजीपीटीला तिची लव्ह स्टोरी सांगितली अन् AI ने तयार केलेल्या अनोख्या डिझाइनने तिच्या हातावर अशी मेहेंदी खुलली की, लग्नात आलेला प्रत्येक पाहुणा एकच प्रश्न विचारत होता – “ही मेहेंदी डिझाइन नेमकी कोणी केली?” कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट अनुषा जैनची ही हटके स्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. नेमकं तिने चॅटजीपीटीला काय काय सांगितलं आणि AI ने कोणती मेहंदीची डिझाईन बनवून दिली त्याबद्दल जाणून घेऊया…
पारंपरिक नव्हे, आठवणी सांगणारी मेहेंदी हवी होती
मुंबईतील कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट अनुषा जैन हिने स्वतःची प्रेमकहाणी ChatGPT ला सांगितली आणि त्याच AI च्या मदतीने आपल्या लग्नासाठी एक आगळीवेगळी, वैयक्तिक मेहेंदी डिझाइन तयार केली. तिची ही भन्नाट कल्पना आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनुषा जैनचे लग्न जानेवारी 2026 मध्ये जयपूरमध्ये झाले. लग्नासाठी तिला नेहमीसारखी पारंपरिक मेहेंदी नको होती. तिची इच्छा होती की, मेहेंदीतील प्रत्येक डिझाइन त्यांच्या प्रेमकहाणीची, कुटुंबाची आणि आयुष्यातील खास क्षणांची साक्ष देणारी असावी. मात्र, अनेक वर्षांच्या आठवणी एका मेहेंदी कलाकाराला समजावून सांगणे तिच्यासाठी अवघड ठरत होते.
Original Post : https://www.instagram.com/chatgptindia/

भावाच्या एका कल्पनेने सगळं बदललं
मेहंदीच्या डिझाईनबाबत मनात अनेक गोष्टींची घालमेल सुरू असताना अनुषाच्या भावाने सहजच, “ChatGPT ला विचारून बघ ना,” असा सल्ला दिला. सुरुवातीला अनुषाला ही कल्पना गंमतीशीर वाटली. पण तिने ती प्रत्यक्षात करून पाहिली. तिने ChatGPT ला तिची आणि होणाऱ्या पतीची प्रेमकहाणी, दोघांची गावे, कुटुंब, इनसाईड जोक्स, लग्नाचे ठिकाण, खास आठवणी आणि अनेक छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या. या सर्व माहितीच्या आधारे ChatGPT ने एक सविस्तर आणि वैयक्तिक मेहेंदी डिझाइनची संकल्पना तयार करून दिली.
मेहेंदीत दिसली संपूर्ण प्रेमकहाणी
चॅटजीपीटीला सगळी स्टोरी सांगितल्यानंतर AI ने तयार केलेल्या मेहंदीच्या डिझाइनमध्ये मुंबई आणि जयपूरचे संदर्भ, दोन्ही कुटुंबांशी संबंधित क्रॉसवर्ड, लग्नस्थळाचा नकाशा, दिल्लीची ऑटो रिक्षा, जयपूरचा हत्ती आणि फक्त नवरा-नवरीलाच समजणाऱ्या अनेक छोट्या आठवणींचा समावेश करण्यात आला होता. यानंतर अनुषाने हे डिझाइन आपल्या मेहेंदी कलाकाराला दिले आणि हेच डिझाइन काढायच, एवढेच सांगितले विशेष म्हणजे कलाकारानेही AI ने तयार केलेली संकल्पना अत्यंत बारकाईने मेहेंदीत साकारली.
‘मी ChatGPT Bride आहे’
लग्नसमारंभात अनुषाच्या मेहेंदीची सर्वत्र चर्चा झाली. उपस्थित पाहुणे वारंवार, ही मेहेंदी डिझाइन कोणी केली? असा प्रश्न विचारत होते. त्यावर अनुषाचे उत्तर एकच होते—”I’m a ChatGPT Bride.” विशेष म्हणजे, अनुषाची ही कहाणी ChatGPT च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही शेअर करण्यात आली असून, तिच्या कल्पकतेचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.
या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, AI ने मेहेंदी कलाकाराची जागा घेतलेली नाही. उलट, वर्षानुवर्षांच्या आठवणी एका सुसंगत डिझाइनमध्ये मांडण्याचे काम ChatGPT ने केले आहे, तर त्या कल्पनेला सुंदर कलाकृतीचे रूप मेहेंदी कलाकाराने दिले. त्यामुळे AI आणि मानवी कौशल्य यांचा सुंदर संगम या अनोख्या मेहेंदीत पाहायला मिळाल्याचे अनेकांनी म्हटले आहे.