नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीस

नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीस

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवतीर्थवर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राणे यांनी आज अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राज्याच्या राजकारणात चर्चाना मोठे उधाण आले आहे.

दरम्यान दोन्ही नेत्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील इतर काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले.

खरं तर, अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. पण त्यावेळी नारायण राणे घरी नव्हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

ही भेट वैयक्तिक कारणासाठी घेण्यात येतेय, असं जरी सांगण्यात येत असेल तरी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणं सहाजिक आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube