मोठी बातमी! माणिकराव कोकाटे अडचणीत, शासकीय सदनिका गैरव्यवहारात अटकेची टांगती तलवार
रमी खेळण्याच्या प्रकरणात कृषिखाते गमावलेले माणिकराव कोकाटे हे ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आलेत.
मागच्या काही दिवसांपूर्वी सभागृहात रमी खेळण्याच्या (Mumbai) प्रकरणात कृषिखाते गमावलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे.
कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रीपद तत्काळ धोक्यात आले नव्हते. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा समोर आला असून जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.
रमी खेळणं भोवलं; माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद जाता-जाता खातं गेलं, काय दिली पहिली प्रतिक्रिया?
शिक्षेची पुष्टी झाल्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची शक्यता आहे. तसच, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
प्रकरण नेमके काय?
मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला होता. कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं.
