Nawab Malik आजारी असल्याचे कोर्टाला मान्य, वैद्यकीय कारणांसाठी जामिनावर होणार सुनावणी
मुंबई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य करत त्यांच्या जमीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. तर अंमलबजावणी संचालनालयाने मात्र मलिक यांना गंभीर आजार नसल्याचा दावा केल्याने, तातडीच्या सुनावणीला विरोध करण्यात आला होता.
नवाब मलिक यांनी ईडीने (ED) केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला. तसेच मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे, त्यांच्या वकीलांकडून करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती नवाब मलिकांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात केली होती. यानंतर नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
मलिक हे गेल्या काही दिवसांपासून अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी निर्देश दिले. यामुळे मलिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना गेल्या वर्षी २३ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. मलिकांवर गंभीर आरोप असल्याचे कारण देत त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला होता.