NCP : “जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच असायचं; बहुतेक वेळा तर…” : पवारांचा नातू पटेलांना भिडला

NCP : “जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच असायचं; बहुतेक वेळा तर…” : पवारांचा नातू पटेलांना भिडला

पुणे : तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, असं म्हणतं राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं आहे. शरद पवार यांची सावली समजली जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासह बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (NCP MLA Rohit Pawar Ask question to MP Praful Patel about hands with Bjp)

यानंतर रोहित पवार यांनी पटेल यांना बंडखोरी करण्याबाबत जाब विचारणारी पोस्ट केली आहे. पवार म्हणाले, प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही…,

 तुम्हाला काय कमी केलं होतं? मिळालेली पदं सांगत रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

तुमच्यावर पवार साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. तुम्हाला काय कमी केलं होतं? अजून काय पाहिजे होतं? असा सवाल करत रोहित पवार यांनी बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही जाब विचारला. शरद पवार यांनी आजपर्यंत दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या सर्व पदांची माहिती देत एक ट्विटर पोस्ट केली आहे. यात त्यांनी वळसे पाटील यांना सवाल विचारले आहेत. तसंच फक्त सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी तुमच्याकडून अपेक्षित नव्हती. यासाठी तुम्ही स्वत:ला माफ करु शकणार आहे का? असाही सवाल रोहित पवार यांनी विचारला. 

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार म्हणाले, दिलीप वळसे-पाटील साहेब, आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? असा सवाल त्यांनी विचारला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube