मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज; इंडियाची बैठक संपताच शरद पवार मैदानात
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसून येत आहे. या दरम्यान आता जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (2 ऑगस्ट) जालन्याला जाणार आहेत. ते साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालयाला भेट देणार असून त्यानंतर अंतवरली सराटी गावातील उर्वरित आंदोलकांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या साखर कारखान्यावर पत्रकार परिषद होणार आहे. (NCP National President Sharad Pawar will go to Jalana to meet the injured protesters in maratha reservation agitation)
असा असणार शरद पवार यांचा दौरा :
शरद पवार हे साडेअकराच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालय आणि वादीगोदरी रुग्णालयाला भेट देतील. त्यानंतर आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. तिथून राजेश टोपे यांच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर पवार यांची पत्रकार परिषदही होणार आहे.
सरकारला सत्तेची मस्ती चढली; आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी घेरले !
नेमकं काय घडलं होतं ?
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; फडणवीसांना घेरत पवार स्पष्टच बोलले
या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.