NCP Political Crisis Live : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, पटेल, तटकरेंना मंत्रिपद ?

  • Written By: Published:
Ajit Pawar

NCP Political Crisis Live : एकनाथ शिंदेंनंतर काल (दि. 2) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली असून, शपथविधीनंतरही अनेक घडामोडी घडत असून, बंडखोरी केलेल्या 9 आमदारांवर शरद पवारांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.  या बंडखोरीनंतर राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा आढावा घेणारा हा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Jul 2023 10:59 PM (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, पटेल, तटकरेंना मंत्रिपद ?

    महाराष्ट्रात भाजपाला नवा मित्रपक्ष मिळाल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुमारे 4 तास चालली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. आता केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रावादीकडून तटकरे आणि पटेल यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

  • 03 Jul 2023 09:15 PM (IST)

    अजित पवारांची शक्तिप्रदर्शनाची तयारी : सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवला निरोप

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. तसेच उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे मुंबईत उदघाटन ठेवण्यात आले आहे.
    मंत्रालयासमोरील A/5 बंगला अजित पवारांचे नवे कार्यालय असणार आहे. बाळासाहेब भवनच्या बाजूलाच पक्ष कार्यालय आहे.

  • 03 Jul 2023 06:44 PM (IST)

    अजितदादांचा गट पक्ष नाही तर फुटीर गट

    पक्षाची मान्यता नसल्याने त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाने निलंबित केले आहे. त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवार यांची पत्रकार परिषद ही किटी पार्टी होती, अजित पवार गट पक्ष नाही तर फुटीर गट आहे. फुटीर गटाला व्हीप बजाविण्याचा अधिकार नाही.

  • 03 Jul 2023 06:33 PM (IST)

    नियुक्त्यांना कायदेशीर आधार नाहीः जितेंद्र आव्हाड

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या चुकीच्या आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले आहेत. ते नव्या नियुक्ता कशा करू शकतात, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

  • 03 Jul 2023 05:58 PM (IST)

    पत्रकार परिषदेत अजितदादांना शरद पवारांनी फटकारले 

    पत्रकार परिषदेत अजितदादांना शरद पवारांनी फटकारले

     

    May be an image of 2 people and text that says 'कुणी अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे letsupp.com पक्षाची बांधणी म्हणजे शिवधनुष्य नाही. लोकांमध्ये जाणे त्यांच्या संपर्कात राहणे हाच मार्ग कुणी अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. जयंत पाटलांना पत्र पाठविण्याचा अधिकार आहे. कायदेशीर बाबी प्रदेशाध्यक्ष पाहतील letsupp.com कुणी नाउमेद होऊ नये म्हणून हा दौरा काढला आहे. तरुणांमुळे पक्ष पुन्हा उभा राहणार आम्ही कुणावर अपात्रतेची कारवाई करणार नाही. आता आम्ही महाराष्ट्र पिंजून काढणार letsupp F'

  • 03 Jul 2023 05:55 PM (IST)

    अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काहींची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

    May be an image of 1 person and text that says 'letsupp.com अजित पवारांकडून नवे पदाधिकारी घोषित राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्षपदी प्रतोदपदी अनिल पाटील कायम अजित पवार विधिमंडळ नेतेपदी रूपाली चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदी अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण प्रवक्तेपदी युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण letsupp F'

  • 03 Jul 2023 05:44 PM (IST)

    जयंत पाटील अन् आव्हाडांच्या निलंबनासाठी पत्र; अजितदादांचा शिंदे पॅटर्न

    बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर आहे म्हणून अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसला आहे, असे अजितदादा म्हणाले. 9 जणांच्यावर कारवाई करावी, असे मी पाहिलं. मला आमदारांनी विधीमंडळ पक्षाचा गटनेता ठरविले आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना निलंबित करावे, असे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना कालच दिले आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

  • 03 Jul 2023 05:37 PM (IST)

    शरद पवार यांचा निर्णय आम्हाला लागू होत नाही : प्रफुल्ल पटेल

    आम्ही हकालपट्टी करायला बसलो नाही. पक्ष व चिन्ह ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच आहे. महायुतीच सरकार उत्तम काम करेल, असे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार यांचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. कारण आमच्याकडे बहुमत आहे. बहुसंख्य आमदारांचे व नेत्यांचे आम्हाला समर्थन आहे. कोणताही वाद होऊ नये असे आम्हाला वाटतं. वाद झाल्यास निवडणूक आयोग याचा निर्णय घेईल. आमच्या आमदार असल्याशिवाय शपथ घेतली नसती. त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती आमदार आहे.

  • 03 Jul 2023 05:29 PM (IST)

    काहींना रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली; अजितदादांचा जयंत पाटलांना टोला

    आम्ही जी भूमिका घेतली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्याची आहे. काही जणांनी काल सांगितले होते की, आम्ही कोर्टात जाणार नाही, जनतेत जाणार. पण अचानक त्यांना रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे म्हणत अजितदादांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

  • 03 Jul 2023 05:25 PM (IST)

    प्रदेशाध्यक्ष होताच तटकरेंकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या

    सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी व आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे यांची प्रदेश प्रवक्ते, महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 03 Jul 2023 05:19 PM (IST)

    त्यांना कारवाईचा अधिकार नाही, पक्ष अन् चिन्ह आमच्याकडे; अजितदादांना पुन्हा ठणकावलं!

    विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीच काम विधानसभा अध्यक्षांना असतं. बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहे. पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे. सर्वात जास्त आमच्याबरोबर आहे. त्यांना निलंबित करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत  अजित पवारांनी शरद पवारांना ठणकावलं आहे.

  • 03 Jul 2023 05:14 PM (IST)

    नियुक्त्यांचे सर्व आता अधिकार तटकरेंना : प्रफुल्ल पटेल

    अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्ष करु शकतात. आमच्या पक्षाच्या घटनेनुसार एका वर्षाच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. अपात्रतेची कारवाई कोणत्याही पत्राद्वारे करण्यात येत नाही. पुढील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे तटकरेंना असणार आहे. जयंत पाटील यांनी सर्व सुत्रं तटकरेंकडे द्यावी, असे पटेल म्हणाले.


     

  • 03 Jul 2023 05:07 PM (IST)

    जयंत पाटलांच्या जागी सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी, अजितदादांची मोठी खेळी

    अजित पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांच्या जागेवर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी याची माहिती दिली आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या इतर नियुक्त्या करतील, असे पटेल यांनी सांगितले. तसेच जयंत पाटलांच्या जागेवर अजित पवारांची विधीमंडळ गटनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनिल पाटील यांना पक्षाच्या प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याची विनंती आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

  • 03 Jul 2023 05:02 PM (IST)

    शरद पवारांनंतर आता अजितदादांची पत्रकार परिषद!

    राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आदी नेते उपस्थित आहे. या बैठकीत अजित पवार काय भुमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 03 Jul 2023 04:56 PM (IST)

    सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतून बडतर्फ; शरद पवारांची कारवाई

    सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतून बडतर्फ झाले आहे. शरद पवारांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. पक्षविरोधी निर्णय घेतल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काही वेळेपूर्वी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना पत्र लिहीत यांच्या बडतर्फिची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    शरद पवार यांनी ही कारवाई केली आहे. सुप्रिया सुळे यांनी काही वेळेपूर्वी ट्विट करत तटकरे आणि पटेल यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती.

  • 03 Jul 2023 04:18 PM (IST)

    तटकरे अन् पटेलांवर कारवाईचे सुप्रिया सुळेंचे शरद पवारांना पत्र

    श्री. सुनील तटकरे आणि श्री. प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना विनंती करते की, घटनतेली 10 व्या सुचीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे निलंबन करावे, असे सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे.

    याच बरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस जारी केली आहे.

  • 03 Jul 2023 03:58 PM (IST)

    बंडानंतर जंयत पाटलांकडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेमायला सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष पदी श्रीमती राखी जाधव यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर आजपासून मुंबई विभागातील सर्व ६ जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे या पत्रात म्हटले आहे. अजित पवार व इतर नेत्यांच्या बंडानंतर जयंत पाटील यांनी हे पत्र जारी केले आहे.

    WhatsApp Image 2023 07 03 At 3.45.14 PM

    WhatsApp Image 2023 07 03 At 3.45.14 PM

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हे नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.

  • 03 Jul 2023 03:51 PM (IST)

    9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटील यांनी जारी केली नोटीस

    पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदार विरोधात राष्ट्रवादीने केली कारवाई केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दहाव्या शेड्युल नुसार पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेश नुसार कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांना नोटीस देण्यात आली आहे.

  • 03 Jul 2023 03:34 PM (IST)

    वळसे पाटील अन् मुंडेंच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवारांची तोफ

    शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.

  • 03 Jul 2023 03:17 PM (IST)

    सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; थोड्याच वेळात अजित पवार करणार घोषणा

    सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.

  • 03 Jul 2023 03:13 PM (IST)

    पक्षाची बांधणी म्हणजे शिवधनुष्य नाही : शरद पवार

    पक्षाची बांधणी म्हणजे शिवधनुष्य नाही. लोकांमध्ये जाणं त्यांच्या संपर्कात राहणं हाच मार्ग आहे. माझा आशीर्वाद आहे असं सांगून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. माझा विश्वास सामान्य मतदार आणि जनतेवर आहे. माझ्या स्वागतासाठी सर्वात जास्त उपस्थिती तरुणांची होती. माझ्या काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. संख्याबळ, कमी होत असतं अशा स्थितीची मला सवय.

  • 03 Jul 2023 02:57 PM (IST)

    अनेक जण योग्य वेळी निर्णय जाहीर करतील : शरद पवार

    कुणी अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. जयंत पाटलांना पत्र पाठविण्याचा अधिकार आहे. जयंत पाटलांनी काय पत्र पाठवलय मला माहित नाही. कायदेशीर बाबी प्रदेशाध्यक्ष पाहतील.  कुणी नाउमेद होऊ नये म्हणून हा दौरा काढला आहे. तरुणांमुळे पक्ष पुन्हा उभा राहणार. आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देणार. अनेक जण योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. अजित पवारांवर दबाव असलयाची माहिती मला नव्हती. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्ट म्हटलं. अजितदादांना सहभागी करुन घेतल्याने मोदींचे आरोप खोटे.

  • 03 Jul 2023 02:51 PM (IST)

    अपात्रतेची कारवाई करणार नाही; शरद पवारांची घोषणा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकार परिषद बंडखोरांना त्यांची जागा दाखविणार असे म्हटले आहे. कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला. आम्ही कुणावर अपात्रतेची कारवाई वगैरे करणार नाही. आता आम्ही महाराष्ट्र पिंजून काढणार. धार्मिक संघर्ष पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात फिरणार.

  • 03 Jul 2023 02:46 PM (IST)

    पहिला मोहरा परत...! आव्हाडांचं सूचक ट्विट

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे काल अजित पवारांसोबत शपथविधीसाठी गेले होते. यानंतर आज त्यांनी आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचे सांगितले. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत याची माहिती दिली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केले आहे.

     

    जितेंद्र आव्हाड यांनी पहिला मोहरा परत असे ट्विट केले आहे. याआधी आमदार मकरंद पाटील हे देखील काल अजित पवारांसोबत होते. आज ते शरद पवारांसोबत दिसून आले आहे.

  • 03 Jul 2023 02:19 PM (IST)

    राष्ट्रवादीकडून प्रतिज्ञा पत्र जाहीर

    अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीसह राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेले आहे. त्यात नगर जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या दोन आमदारांची दुसऱ्याच दिवशी डळमळीत भूमिकासमोर आली असून, आमदार नीलेश लंके आणि डॉ. किरण लहामटे यांच्या ताज्या वक्तव्याने संदिग्धता आणखी वाढली आहे. तर, आशुतोश काळे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून सध्या तरी एकटे असून संग्राम जगताप त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिज्ञा पत्र जाहीर केले आहे. हे पत्र आता कोणकोण भरून त्यावर सह्या करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    NCP Oath Letter

    NCP Oath Letter

  • 03 Jul 2023 02:11 PM (IST)

    मी साहेबांसोबत; अजितदादांसोबत गेलेल्या अमोल कोल्हेंचे घुमजाव

    अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार खासदारांनी अजितदादांचा हात धरत शरद पवारांना धक्का दिला. यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हेदेखील आघाडीवर होते. मात्र, आता त्यांनी कालच्या बंडखोरीनंतर घुमजाव करत मी साहेबांसोबत असल्याचे म्हटले आहे. कोल्हेंनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी मी साहेबांसोबत असल्याचे हॅश टॅगमध्ये म्हटले आहे. तसेच  जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। अशा आशयाच्या ओळी टाकत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अमोल कोल्हे काल राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आज त्यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केले आहे. त्यामुळे बंडानंतर अजितदादांना कोल्हेंच्या स्वरूपात पहिला धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे.

    शपथविधीची कल्पाना नव्हती

    “मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती”, असा दावा अमोल कोल्हेंनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे.

     

  • 03 Jul 2023 01:37 PM (IST)

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रोटोकॉल तोडून फडणवीसांच्या बंगल्यावर

    मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान येथे शुकशुकाट असून, राष्ट्रवदीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.

    याठिकाणी खाते वाटपासंदर्भात खलबतं झाल्याचे सांगितले जाक आहे. परंतु, एकीकडे पक्ष फुटीचा वाद विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात असताना नार्वेकर प्रोटोकॉल मोडत उपमुखमंत्र्यांच्या निवास्थानी दाखल झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

  • 03 Jul 2023 01:24 PM (IST)

    अजितदादांची चार वाजता पत्रकार परिषद; अन्य नेत्यांना न बोलण्याची तंबी

    कालच्या बंडानंतर आजित पवार दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवारांकडून पक्षाची भूमिका मांडली जाणार असून, ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असेल. यात अजित पवार गटाची भूमिका आणि आगामी काळात कशा पद्धतीने काम करणार याबाबत अजित पवार भाष्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. तोपर्यंत कोणत्याही नेत्याला माध्यमांशी किंवा कोणत्याही प्रकारची  भूमिका न मांडण्याची तंबी देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवारांकडून खात्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेत नेमकं काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 03 Jul 2023 01:03 PM (IST)

    कराडमध्ये जमलेली गर्दी सांगते पवारांना जनतेची साथ - आव्हाड

    कराडमध्ये जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे याची कल्पना आली असेल. आजपासून नवीन लढाई सुरू करणार असल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले. पवार साहेब आता रस्त्यावर आलेले आहेत. कराडमध्ये जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे आहे, याची सर्वांनाच कल्पना आली आहे.

    अजित पवारांनी गद्दारी केली का, या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे. पवारांनी आपल्या विरोधात सभा घेतली तर काय अशी भीती अजित पवारांसोबत गेलेल्या लोकांना वाटू लागली आहे. कालच पवारांनी सांगितले आहे की, पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रवादी माझी आहे.

    गेलेल्या अनेक आमदारांचे आम्हाला फोन येत असल्याचे आव्हाडांनी यावेळी सांगितले. तसेच जर पवार एवढं स्पष्टपणे सांगत असतील तर, त्यांचा फोटो वापरण्याची परवानगी त्यांच्याशिवाय कुणालाही नाही. त्यांची परवानगी असेल तर पवारांचा फोटो जरूर वापरावा. नाही तर, तुमच्याकडे आहेत ना राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल त्यांचा फोटो वापरावा असा सल्लाही आव्हाडांनी बंडखोरांना दिला.

    आम्हाला माहिती आहे आमच्याबरोबर कोण कोण आहे, आम्हाला काही बोलायचं नाही. आमदार पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांना आपला वैरी बनू इच्छित नाही. लवकरच चित्र स्पष्ट होईल अजून घटनेला 24 तास झालेले नाही. अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांची आम्ही 5 जुलैपर्यंत वाट बघू असा अल्टिमेटमही आव्हाडांनी यावेळी बोलताना दिला आहे.

     

  • 03 Jul 2023 01:00 PM (IST)

    दिलीप वळसे-पाटील, पटेल, भुजबळ हे पाठवल्याशिवाय जाणार नाही; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

    काल राज ठाकरेंनी राज्यातील राजकारणाचा दिगू टीपणीस झाला असे ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज त्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. ते शीवतीर्थवरून माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात गेल्या दोन अडीच वर्षापासून जे राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललं आहे. या लोकांना मतदारांशी घेणे देणं नाही. पक्षाचे कट्टर मतदार होते, याचा सर्वाना विसर पडला आहे.

    स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करायचं हे पेव फुटलं आहे. मला वाटतं लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याचा गरज आहे. लवकरच मेळावा घेणार आहे. तसेच, महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले तरी दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे पाठवल्याशिवाय जाणार नाही.

    उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनंतर झाली. शत्रू कोण मित्र कोण कळत नाही,” अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

Tags

follow us