Maharashtra Political Crisis Live : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांना टोला

  • Written By: Published:
JITENDRA AAVHAD

Maharashtra Political Crisis Live Update :  राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडल्या. अजित पवारांनी तर आता पवार साहेबांचे वय झाले असून, आमच्या वरिष्ठांना कधी थांबले पाहिजे याचा विसर पडल्याचा इशारा दिला. दुसरीकडे पवारांनी पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नसल्याचे अजितदादांना ठामपणे ठणकावलं आहे. शरद पवार गटाकडून १९ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर, अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणुक आयोगाकडे सादर केले असून, अजितदादांच्या बंडाचे मिनिट टू  मिनिट अपडेट देणारा हा लाईव्ह ब्लॉग….

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Jul 2023 08:07 PM (IST)

    नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांना टोला

    नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही की माझं काही बॅकग्राऊंड नाही. माझ्यामागे कुणीच नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकद आहे ती म्हणजे शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढं सगळं होऊनही मी बोलताच राहतो, त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.

  • 05 Jul 2023 06:18 PM (IST)

    'पक्ष कार्यकर्त्यांनी आणि विचारसरणीने चालतो, नेत्यांनी नाही'

    पक्ष हे नेते चालवत नाहीत तर कार्यकर्ते आणि विचारधारेने चालतात. पवार साहेबांनी 60 वर्षे एक विचारधारा जपली. त्याच विचारधारेने कामगार काम करत आहेत. तुम्ही तुमची विचारधारा बदलत राहिल्यास लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

  • 05 Jul 2023 06:14 PM (IST)

    वयाचा फारसा फरक पडत नाही - रोहित पवार

    अजितदादांनी पवारांच्या वय काढत एक प्रकारे थेट निवृत्ती घ्या असाच इशारा दिली आहे. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की,  2019 मध्ये आपण राजकारणात उतरलो आणि विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा पवार साहेब 82 वर्षांचे होते. त्यांच्यामुळेच आपल्यापैकी बहुतेकजण निवडून आले. त्यामुळे मला वय फारसे महत्त्वाचे वाटत नाही. शरद पवार जनतेत गेल्यावर जनता कोणासोबत आहे हे कळेल.

  • 05 Jul 2023 06:11 PM (IST)

    भाजप जेव्हा दोनशेवरून 300 पर्यंत जाऊ शकते तर...

    शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी काळात आमचे आमदार आणि खासदार निवडून येण्यास मदत करेल असे मला वाटते. आम्ही नक्कीच जिंकू शकतो. भाजप जेव्हा दोनशेवरून 300 पर्यंत जाऊ शकते तर, आम्ही ते का करू शकत नाही.

  • 05 Jul 2023 04:55 PM (IST)

    पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

    बंडानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या बैठकांचे सत्र आज पार पडले. पवारांच्या बैठकीपूर्वी एमएटी इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवारांचे दणकेबाज भाषण झाले. यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही असे स्पष्ट शब्दांत ठणकावले. यानंतर भाषणाच्या शेवटी 'उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' या गाण्याच्या बोल म्हणत शरद पवारांनी या बंडाविरोधात लढण्याचा एल्गार ठोकला.

  • 05 Jul 2023 04:37 PM (IST)

    आम्ही सत्तेचे भुकेले नाही - पवार

    पुढे बोलताना पवार म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेला 24 वर्षे झाली असली तरी ही बैठक ऐतिहासिक आहे. आज देश आपल्याकडे पाहत आहे, कार्यकर्त्यांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असे शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेचे भुकेले नाही, आम्ही सेवेच्या भावनेने पुढे जात आहोत. मी लोकांमध्ये आहे, सत्तेत नाही. मी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे, विरोधी विचारसरणीसोबत काम करणे योग्य नाही. अजित पवारांनी न बोलता पक्ष फोडला. मी काँग्रेस सोडल्यावर माझा स्वतःचा पक्ष काढला, मी हवे असते तर काँग्रेस फोडू शकलो असतो असेही पवार यावेळी म्हणाले.

  • 05 Jul 2023 04:32 PM (IST)

    मला पांडूरंग म्हणायचं आणि....

    मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी फडणवीसांनी केली, शब्द पाळला नाही याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली.

  • 05 Jul 2023 04:26 PM (IST)

    आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो

    चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो. माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत असल्याचाही पवारांनी उल्लेख केला. ज्या आमदारांनी विभाजनाचा निर्णय घेतला, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

  • 05 Jul 2023 04:19 PM (IST)

    पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच - पवार

    बंडानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नावासह चिन्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, आगामी काळातील सर्व निवडणुका या राष्ट्रवादीच्या नावावक तसेच घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. या दाव्यावर आता शरद पवारांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले की, पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत असल्याचाही पवारांनी उल्लेख केला. ज्या आमदारांनी विभाजनाचा निर्णय घेतला, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

  • 05 Jul 2023 04:16 PM (IST)

    माझ्या बापाचा नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे

    श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्त आहे. माझ्या बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊन पण, बापाचा नाद करायचा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाय. बी. सेंटर येथे आयोजित सभेत अजित पवार गटाला ठणकावून सांगितले.

     

  • 05 Jul 2023 04:15 PM (IST)

    राष्ट्रवादी भ्रष्ट मग शपथ देऊन मंत्रिमंडळात का घेतलं ?

    प्रधानमंत्री मोदींनी भोपाळला भाषण केलं. त्यांनी सांगितलं राष्ट्रवादीनं सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं. काँग्रेसनं भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं. अभ्यास नसताना विधान करणे शहाणपणाचं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  राष्ट्रवादी भ्रष्ट असेल तर कालच्या शपथविधीत राष्ट्रवादीला का घेतलं.

  • 05 Jul 2023 04:11 PM (IST)

    अजित पवार यांना काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते

    अजित पवार यांना काही अडचण होती तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. त्यांच्या मनात काही असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकले असते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत त्यांच्या गटाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले. 

  • 05 Jul 2023 04:01 PM (IST)

    आजच्या राज्यकर्त्यांत संवादच राहिला नाही

    आज संकट खूप आहेत. आपल्याला पुढं जायचं आहे. केंद्र सरकारमध्ये मी खूप काम केलं. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. एखादी गोष्ट योग्य असेल तर पण जनतेच्या हिताची असेल तर मार्ग काढला जात होता. आज मात्र संवाद राहिलेला नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

  • 05 Jul 2023 03:57 PM (IST)

    देशातील सगळ्यात भ्रष्टाचारी पार्टी म्हणजे भाजप

    आपल्याला भाजपाच्या प्रवृत्तीविरोधात लढायचं आहे. पंतप्रधान मोदी म्हणायचे या देशातील नॅचरल करप्ट पार्टी म्हणजे राष्ट्रवादी आहे.पण मी म्हणजे या देशात सगळ्यात करप्ट पार्टी भाजप आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.

  • 05 Jul 2023 03:43 PM (IST)

    भाजपाचे 105 निष्ठावंत आमदारांपैकी फक्त चार ते पाचच मंत्री

    भाजपमधील 105 निष्ठावंत आमदारांपैकी फक्त चार ते पाचच आमदारांना मंत्री केलं. म्हणजे दुसऱ्याची कबर खोदता खोदता आपलीच कबर खोदायचं काम महाराष्ट्रात चालू आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

  • 05 Jul 2023 03:39 PM (IST)

    राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्हाच्या संदर्भात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. अजित पवार यांनी एनसीपी आणि पार्टी चिन्हावर दावा ठोकत याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह 9 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याच्या उद्देशाने याचिका दाखल केली आहे.

  • 05 Jul 2023 03:08 PM (IST)

    नेत्यांनी सांगितलं म्हणून मी कुठे बोललो नाही...

    नेत्यांनी सांगितलं म्हणून मी कुठे बोललो ना्ही. त्यानंतर अचानक बदल झाला. आम्हाला सांगितलं आपण शिवसेनेसोबत जायचं. 2017ला शिवसेना जातीयवादी होता. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही, असंही ते म्हणाले.

  • 05 Jul 2023 03:01 PM (IST)

    2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच सरकार येणार

    2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच सरकार येणार आहे. आपल्याला ताकदीने विधानसभा लढवायची आहे. आपले 54 आमदार आहेत, तेवढ्या जागा तर आपल्याला मिळणारच आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या जागा आपल्याला मिळतील. जवळपास 90 जागा आपल्याला लढवायच्या असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. प्रत्येक वेळी करिश्माई नेतृत्त्वाची गरज असते असे म्हणत अजित पवारांनी इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. काँग्रेसमध्ये फुट पडली आणि पुलोदची स्थापना झाली तेव्हा शरद पवार 38 वर्षांचे होते असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा काळ येत असतो अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

  • 05 Jul 2023 02:50 PM (IST)

    वयाची ऐंशी ओलांडली आता तरी...; अजितदादांचा साहेबांना थेट सवाल

    यावेळी बोलताना अजितदादांनी अनेक विषयांवर परखडपणे भाष्य करत पवारांचे वय आता 83 झाले असून, आता तरी तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? आशीर्वाद देणार की नाही ? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असे बोलत साहेबांना थेट इ्शारा दिला आहे. एवढेच नव्हे तर, पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय झालं होते याबाबत अजितदादांनी अनेक गौप्यस्फोट केले.

    ते म्हणाले की, माझी काय चूक? मला का नेहमी जनतेसमोर व्हिलन करता, असा प्रश्न पवारांना विचारत २०१९ साली भाजपबरोबर सरकार बनवण्यासाठी एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी फडणवीसांबरोबर पाच बैठक झाल्या, शेवटच्या क्षणी वरिष्ठांकडून निर्णय फिरवण्यात आल्याचेही यावेळी अजितदादांनी सांगितले. पवारांनीच पहाटेच्या शपथविधीला पाठवलं. 2019 मध्ये भाजपसोबत 5 बैठका झाल्या एवढेच नव्हे तर, फडणवीस आणि मला कुठेही न बोलण्यास सांगण्यात आले.

    2017 मध्येही वर्षा बंगल्यावर आमची बैठक झाली होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशावरून छगन भुजबळ, जयंत पटेल, मी आणि इतर अनेकजण तिथे गेलो होतो. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळ वाटप आणि पालकमंत्र्यांची पदे यावर आमच्यात चर्चा झाली. पण नंतर आमच्या पक्षाने एक पाऊल मागे घेतले. 

     

  • 05 Jul 2023 02:43 PM (IST)

    पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट

    २०१७ मध्ये काही वेगळे करण्याचा प्रयत्न झाला. प्रफुल भाई यांनी सांगितले आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देतो आम्ही गप्प बसलो. देवेंद्र यांचा शपथविधीला गेलो. त्यावेळी जायचं नव्हतो तर जायला का सांगितलं? पुन्हा जे काही घडले ते सर्वांनाच माहिती आहे. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, भुजबळ आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत दादा असे चौघे जण होतो. सगळं काही ठरलं. पालकमंत्री ठरले. मी कधी खोटे बोलणार नाही. खोटे बोललो तर पवारांचाही औलाद सांगणार नाही असेही यावेळी अजितदादांनी सांगितले.

  • 05 Jul 2023 02:33 PM (IST)

    आतापर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री असता

    २००४ला आलेली संधी सोडली नसती तर मी आज २०२३मध्ये सांगतोय आतापर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री असता असे अजित पवारांनी सांगितले. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, त्यांच्या छत्रछायेत आम्ही काम करायला तयार आहोत, असे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. राज्यघटना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही या सरकारचा भाग झालो आहोत, साहेबांसोबत आहोत पण जे राजकारण सुरू आहे ते पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

  • 05 Jul 2023 02:28 PM (IST)

    2004 मध्ये आपम सीएम पदाची संधी गमावली - अजित पवार

    1999 मध्ये मला दोन खाती मिळाली. प्रत्येकाचा काळ असतो. मी आज जो काही आहे तो पवार साहेबांमुळेच असल्याचे सांगत मी कधीच जातीपातीचं राजकारण करणारा व्यक्ती नाही. माझ्या कामची पद्धत संपूर्ण राज्याला माहिती आहे. 2004 मध्ये आपम सीएम पदाची संधी गमावल्याचे अजितदादांनी सांगितलं. सगळच आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी हे सर्व केलेले नाही. आमच्या लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि मी तसचं काम करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

  • 05 Jul 2023 02:16 PM (IST)

    पटेलांची विनंती अन्....

    प्रफुल पटेल यांचे भाषण संपताना त्यांनी उपस्थितांना अजित पवारांना मोबाईलचा टॉर्च लावून पाठिंबा दर्शण्याची विनंती केल्या. त्यावर उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न करत लाईट लावत दादांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. आपल्या भाषणात अजितदादा म्हणाले की, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 साली केली. 67 साली उमेदवारी मिळाली. 72 साली राज्यमंत्री झाले. 78 साली असाच एक संघर्ष उद्धभवला आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादांचे सरकार बाजूला करुन सरकार स्थापन केले. पुलोदमध्ये तेव्हाचा भाजप जनसंघदेखील समाविष्ट होता.

  • 05 Jul 2023 02:08 PM (IST)

    प्रफुल पटेल या मंचावर का?

    अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या अगदी जवळचे सहकारी असणारे प्रफुल्ल पटेल हे दादांसोबत गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आपण अजितदादांना का साथ दिली हे आता नाही तर, वेळ आल्यावर सांगेल. प्रफुल्ल पटेल म्हणजे पवारांची सावली अशी ओळख सर्वांना असल्याचे सांगत येणाऱ्या काळात आपणही पुस्तक लिहिणार असून, त्यातून अनेक खुलासे होती असे म्हणत पटेल यांनी एकप्रकारे शरद पवारांना दमच दिल्याचे दिसून येत आहे.

    आपल्या भाषणात पटेल म्हणाले की, मंत्री, आमदार यांनीच भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. दादांला काही लोक बदनाम करत आहेत. जे आरोप करत आहेत हे ते चुकीचे आहेत. 2022 मध्ये जेव्हा मविआ सरकार कोसळणार होते हे नक्की झाले. तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरज, गुवाहाटी पर्यटनाला होते. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेतील विधान परिषदमध्ये असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी, मंत्रींनी आदरणीय पवार साहेबांकडे जाऊन सांगितले की आम्हाला या सरकारमध्ये भाजपाबरोबर सामील करण्यासाठी तुम्हाला विनंती करत आहोत. ही गोष्ट प्रत्येक आमदारांना माहित होती. असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

  • 05 Jul 2023 01:54 PM (IST)

    आज माझे मन रडतय

    पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज माझ्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत. कारण आज माझे मन रडतय. आदरणीय दादांनीसुद्धा आयुष्यभर राजकारण साहेबांसोबत केले. ते करत असताना साहेबांसाठी गुगली तर नाही ना? जीवनात कितीही प्रसंग आले असतील तरी आयुष्यात संधी देताना कितीही चांगली संधी स्वतःला काही मिळाले नाही तरी कार्यकर्त्यांना दिल्याचे यावेळी ते म्हणाले.

  • 05 Jul 2023 01:41 PM (IST)

    अजितदादा टीकेचे धनी होतात - धनंजय मुंडे

    आपण अनेक वर्ष साहेबांची सेवा केली. साहेब विठ्ठल आणि आपण वारकऱ्यासारखं राहिलो. मी या प्रसंगातून याआधी गेलोय त्यामुळे आता काय वाटत असेल हे मी समजू शकतो. शेवटी साहेबांना देखील स्वाभिमानासाठई निर्णय घ्यावा लागला होता. साहेबांचे सर्व सहकारी आमच्याोबत आहे. काही 2-4 जण तिकडे असून भुजबळ साहेबांनी त्यांना योग्य असा बडवे हा शब्द वापरला. काहीही घडले की अजितदादा टीकेचे धनी होतात. मात्र, त्यांनी त्यांचं दुःख त्यांच्या सावलीलाही सांगितलेले नसल्याचे धनंजय  मुंडे यांनी सांगितले अजितदादांवर आत्तापर्यंत बरीच टीका झाली. त्यांनी किती अपमान सहन केले, पण ते त्यांच्या सावलीलाही कळू दिले नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं.

  • 05 Jul 2023 01:39 PM (IST)

    शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल

     अजित पवारांच्या एमईटी येथे बैठकीला सुरूवात झाली असून, भुजबळांनी बैठकीची प्रस्तावना केली तसेच पवार साहेब आमचे विठ्ठल असल्याचे सांगत त्यांना बडव्यांनी घेरले आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले असून, पवार दाखल होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत केले.

  • 05 Jul 2023 01:27 PM (IST)

    शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अनिल देशमुख आणि अन्य नेते आणि कार्यकर्त्यांसह वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पोहोचले आहेत.  

  • 05 Jul 2023 01:22 PM (IST)

    तेव्हा त्यांनादेखील वाईट वाटलं असेल...

    तुम्ही वसंतदादा पाटील यांना सोडलं त्यावेळी त्यांनादेखील वाईट वाटलं असेल असे म्हणत भुजबळ म्हणाले की,  मी शिवसेना सोडली  त्यावेळी बाळासाहेब आणि माँसाहेब यांनादेखील वाईट वाटले होते. धनंजय मुंडे हे जेव्हा राष्ट्रवादीत आले त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आश्रु  तरळले होते असे म्हणत आम्हालाही कायदे कळतात; कोणीही अपात्र होणार नाही असा विश्वासही छगन भुजबळांनी यावेळी व्यक्त केला.

  • 05 Jul 2023 01:19 PM (IST)

    बडव्यांना बाजूला सारत आम्हाला आशीर्वाद द्यायला या

    भाषणादरम्यान, भुजबळांनी शायरी सादर केली. तसेच आम्ही आमच्या स्वताशीच वादा केल्याचे सांगत हार पत्कारणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठ असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. घेरलेल्या बडव्यांना बाजूला सारत साहेबांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी याव अशी आर्त विनवणीदेखील भुजबळांनी यावेळी केली.

Tags

follow us