NEET Paper Leak : एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने असा फोडला कुलकर्णीचा सेट केलेला ‘मास्टर’ प्लॅन!
NEET Paper Leak आपली सहकारी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने त्याने पुण्यातील राहत्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी 'स्पेशल कोचिंग क्लासेस' घेतले.
NEET Paper Leak Update : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या NEET-UG 2026 च्या पेपर लीक प्रकरणाचा सीबीआयने (CBI) पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा पेपर लीक कोणत्याही आंतरराज्य सिंडिकेटने केला नसून, पुण्यातील एका केमिस्ट्री लेक्चररने आपल्या कोचिंग सेंटरला ‘सुपरहिट’ करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. पी.व्ही. कुलकर्णी असे या मुख्य सूत्रधाराचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातल्या घरात रंगला ‘लबाडी’चा क्लास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी हा मूळचा लातूरचा असून पुण्यात कार्यरत होता. त्याने आपल्या कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांचे निकाल सुधारण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा कट रचला. आपली सहकारी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने त्याने पुण्यातील राहत्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेशल कोचिंग क्लासेस’ घेतले. या क्लासेसमध्ये कुलकर्णीने परीक्षेत येणारे प्रत्यक्ष प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरे सविस्तरपणे समजावून सांगितली होती. यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली होती.
एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने केली पोलखोल
कुलकर्णीचा हा प्लॅन गुप्त राहणार होता, मात्र एका विद्यार्थ्याने त्यात मिठाचा खडा टाकला. त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या पैशांची वसुली करण्यासाठी कुलकर्णीने दिलेला तो ‘लीक गेस पेपर’ सोशल मीडियावर इतर कोचिंग क्लास चालकांना पाठवला. तिथून हा पेपर वाऱ्यासारखा पसरला. 3 मे 2026 रोजी जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा झाली, तेव्हा मुलांनी वहीत लिहिलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिका हुबेहूब जुळली आणि एकच खळबळ उडाली.
सीबीआय तपासातील महत्त्वाचे मुद्दे
गेल्या 24 तासांत सीबीआयने विविध राज्यांत छापेमारी करून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही सर्व साधने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (CFSL) तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे येथून एकूण 7 जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत नेण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले होते. आता सीबीआय या पैशांचा प्रवास (Money Trail) शोधण्यासाठी आर्थिक तपास करत आहे.
कसा उघड झाला गुन्हा?
12 मे 2026 रोजी शिक्षण मंत्रालयाने तक्रार दिल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान केमिस्ट्री पेपर लीकचा मुख्य स्त्रोत आणि विद्यार्थी-पालक यांच्यामधील मध्यस्थांची साखळी सीबीआयच्या हाती लागली आहे.