मुलुंडच्या वार्ड क्र. 107 मध्ये निल सोमय्यांचा विजय जवळपास निश्चित; अपक्षांची गर्दी आणि औपचारिकतेपुरती लढत?
प्रभाग क्रमांक 107 मधील लढतीत नील सोमय्या यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड; प्रमुख विरोधी उमेदवाराचाच अर्ज बाद.
Neel Somaiya’s victory is almost certain in Mulund’s Ward No. 107 : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबई(Mumbai) महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांचाही त्यात समावेश आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या(Neel Somaiya) हा मुंबईतील मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र, मतदानाआधीच या वॉर्डमधील लढत जवळपास एकतर्फी झाल्याचं चित्र आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं की, प्रभाग क्रमांक 107 मधून नील सोमय्या निवडणूक लढवत असून, या वॉर्डमध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस तसेच शरद पवार गटाचा एकही उमेदवार सध्या रिंगणात उरलेला नाही. विशेष म्हणजे, मुलुंडमधील इतर पाच प्रभागांमध्ये मात्र या सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. “देवाची लीला अपरंपार आहे,” अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
BMC Elections
Neil Somaiya ward 107 in Mulund
1. Uddhav Thackeray Sena UBT
2. Raj Thackeray MNS
3. Sharad Pawar NCP
4. Rahul Gandhi Congresshave NOT put up candidates
God is Great @BJP4India @Dev_Fadnavis @NeilSomaiya
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 1, 2026
नील सोमय्या हे 2017 साली पहिल्यांदा याच प्रभागातून निवडून आले होते. यंदा ते दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा परिसर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गुजराती आणि मारवाडी समाजाची मोठी लोकसंख्या या भागात असल्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही मुलुंडचा मोठा भाग भाजपच्या पाठीशी उभा राहताना दिसतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक 107 मधील लढतीत नील सोमय्या यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड मानलं जात आहे.
दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाची युती झाल्याने या वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून हंसराज दनानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी अर्जासोबत आवश्यक प्रतिज्ञापत्र न जोडल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला. प्रमुख विरोधी उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने नील सोमय्या यांच्यासमोरचं आव्हान मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे.
तथापि, या वॉर्डमध्ये वंचित बहुजन आघाडीसह तब्बल नऊ अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कुणी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक 107 मधील ही लढत औपचारिकतेपुरती मर्यादित राहते की शेवटच्या क्षणी काही राजकीय हालचाली घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
