नगर–मनमाड महामार्ग विकासकामांसाठी 4.68 कोटींचा निधी; खासदार लंकेंच्या पाठपुराव्याला यश
Nilesh Lanke : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग
Nilesh Lanke : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहिल्यानगर बायपासवरील पूरप्रवण भागातील सुधारणा, पूरनियंत्रण तसेच सुविधा विकासासाठी तब्बल 4.68 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले की, “ही मंजुरी केवळ निधीपुरती मर्यादित नाही, तर गेल्या अनेक महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे. दिल्लीतील मंत्रालयीन चर्चेनंतर अखेर ही कामे मंजूर झाली असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.”राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाकडून 7 नोव्हेंबर रोजी जारी आदेशानुसार पुढील प्रमुख कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सारोळाबद्दी येथे सर्व्हिस रोड व आरसीसी गटार बांधकाम, नारायणडोह, नेप्ती (कल्याण जंक्शन) व पुणे जंक्शन परिसरात आरसीसी गटार कामे, आरणगाव येथे पथदिव्यांची उभारणी, मांडळी–नागमठाण व देहेरे येथील बोगद्यांचे बांधकाम व दुरुस्ती यांचा समावेश आहे. ही सर्व कामे पुढील 15 ते 30 दिवसांत सुरू होणार असून, संबंधित कंत्राटदार व प्रकल्प संचालक कार्यालयाला यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर–मनमाड महामार्ग कामांना वेग
कुंभमेळा 2027 लक्षात घेता नगर–मनमाड (Nagar-Manmad Highway) राष्ट्रीय महामार्ग (रा.मा. 160) या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील कामांना गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प मिश्र वार्षिक पद्धत या तत्त्वावर राबविला जात असून, एप्रिल 2027 पर्यंत पूर्णत्वाचा करार असला तरी डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. “या महामार्गाच्या कामासाठी मी स्वतः 11 जुलै 2025 रोजी बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर केंद्र सरकार व एनएचएआय प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली,” असे खासदार लंके यांनी सांगितले.
विविध टप्प्यांवर वेगवान काम
सध्या विविध टप्प्यांवर जलद गतीने काम सुरू आहे. त्यात राहुरी ते राहुरी फॅक्टरी विभागातील एक बाजूचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. कोल्हार – बाबळेश्वर विभाग डांबरीकरणासाठी तयार आहे तर शनिशिंगणापूर फाटा ते विळद बायपास विभागात प्रत्यक्ष काम सुरू असून, प्रकल्प नियोजनाप्रमाणे पुढे सरकत आहे असे खा. लंके म्हणाले.
IND vs AUS 2025 : शानदार! भारताने जिंकली टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव
आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची किल्ली
खासदार लंके म्हणाले, “अहिल्यानगर व परिसरातील महामार्ग विकास ही केवळ वाहतूक सुलभतेची बाब नाही, तर ती प्रदेशाच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाची किल्ली आहे. पूरप्रवण भागातील सुधारणा, सर्व्हिस रोड, गटार व्यवस्था आणि पथदिव्यांची उभारणी यामुळे नागरी जनतेला मोठा दिलासा मिळेल. कुंभमेळा 2027 पूर्वी हे सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.”
