अहिल्यानगर जिल्हा बँक आता शेतकऱ्यांची बँक म्हणून काम करणार; विजयानंतर निलेश लंके स्पष्टच बोलले
Ahilyanagar District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय
Ahilyanagar District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही दुसऱ्यांना विकत घ्या, दादागिरी करा, सहलीला घेऊन जा पण आमचा एकच नेता आहे, तो म्हणजे निलेश लंके, हे जनतेने दाखवून दिले, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. हा विजय केवळ एका जागेचा नसून पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणाला जनतेने दिलेले उत्तर असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.लंके म्हणाले आम्ही एक अन् एक मत घेत पुढे जात असतो. 24 मतांनी आपण निवडून आलो. दुसऱ्यांना विकत घेण्याचे, दादागिरी करण्याचे आणि उमेदवारांना सहलीला घेऊन जाण्याचे राजकारण काहींनी केले असेल; मात्र जनतेने आपला नेता कोण आहे, हे मतदानातून दाखवून दिले आहे.
कारखानदारांनी घेतलेले हजारो कोटी; आता हिशेब चुकता करणार
विजयानंतर लंके (Nilesh Lanke) यांनी थेट जिल्हा बँकेच्या आर्थिक कारभारावर निशाणा साधला. आता माझ्या डोक्यात बँक सुधारण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या बँकेतून कारखानदारांनी किती हजार कोटींची कर्जे घेतली आहेत, याची माहिती मला आहे. बँक शेतकऱ्यांची असताना तिच्या पैशांचा वापर मात्र कारखानदारांसाठी झाला. राहुरी कारखान्याच्या नावाखाली काही लोकांनी दोनशे ते तीनशे कोटी रुपये घेतल्याचा विषय आहे. बँकेतील अनियमिततेचा संपूर्ण हिशेब तपासावा लागेल. चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बँकेचा कारभाराबाबत लवकरच रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) भेट घेण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ही बँक कारखानदारांची होती परतू आता माझ्यासारखा मातीतला माणूस बँकेत पोहोचला आहे. यापुढे ही बँक शेतकऱ्यांचीच राहील. बँकेच्या बैठकीला मी आलो की तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. बँकेच्या कारभाराचे कागदच वाचून दाखवतो असे आव्हानही त्यांनी दिले.
सिंह तो सिंहच असतो’; विरोधकांना शेरोशायरीतून टोला
विजयाच्या जल्लोषात लंके यांनी विरोधकांना शेरोशायरीच्या शैलीतूनही टोला लगावला. ‘हम टायगर को गले में पट्टा डाल के घुमते है’ जंगलात अनेक प्राणी असतात पण जंगलाचा राजा सिंहच असतो. सिंहाची शिकार करण्यासाठी सगळे एकत्र आले तरी सिंह तो सिंहच असतो आणि राजा तो राजाच असतो. तो जनतेचा राजा असतो अशा शब्दांत त्यांनी आपल्या विजयाचे वर्णन केले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
भाजपच्या ‘मोठ्या भाऊ’गिरीला देसाईंचा ठसका! साताऱ्यात विजयी होत दिला राजकीय इशारा-
राजकारणात नवी समीकरणे; राम शिंदे, थोरात, विखेंनाही सोबत घेण्याची तयारी
विजयानंतरच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना लंके यांनी आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी दर्शवली. आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहोत. सभापती राम शिंदे साहेब असतील, मी, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहोत. वेळ आली तर थोरात साहेबांनाही बरोबर घेऊन काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवत लंके यांनी विरोधकांना राजकीय धक्का दिला असतानाच आता बँकेच्या कारभारात बदल घडविण्याची भाषा केली आहे. कारखानदारांच्या कर्जाचा हिशेब, कथित अनियमितता, थकबाकीची वसुली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या मुद्द्यांवर आगामी काळात जिल्हा बँकेचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीत मिळालेल्या विजयापेक्षा आता बँकेतील कारभार बदलण्याच्या लंके यांच्या घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.