संग्राम जगताप अजितदादांकडे जाताच अभिषेक कळमकर शरद पवारांकडे

संग्राम जगताप अजितदादांकडे जाताच अभिषेक कळमकर शरद पवारांकडे

Ahmadnagar Politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीने सर्वाधिक खळबळ नगरच्या राजकारणात उडाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी धाकल्या पवारांची वाट धरली आहे. पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेल्या शरद पवारांनी आता जगतापांविरोधात तोडीचा उमेदवार शोधला आहे. माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे अभिषेक कळमकर हे पूर्वी राष्ट्रवादीमध्येच होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अभिषेक कळमकर राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्यांच्या काकांनी देखील पुतण्याच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे जोर लावला होता पण अजित पवारांनी संग्राम जगताप यांच्या पारड्यात वजन टाकले होते. त्यामुळे नाराज झालेल्या अभिषेक कळमकर यांचे आमदार जगताप यांच्याशी खटके उडाले होते. यातूनच जगताप यांच्या कार्यकर्त्यांशी वाद होऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडत शिवबंधन हाती बांधले होते.

माजी आमदार दादा कळमकर हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. गेले अनेक वर्षे ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीत होते. आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार फ्रेश चेहऱ्याच्या शोधात होते. आज अभिषेक कळमकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार दादा कळमकर उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिषेक कळमकर यांच्याकडे अहमदनगर शहर प्रभारी जिल्हाध्यक्ष पदीची जबाबदारी दिली आहे.

अमित ठाकरेंचं वक्तव्य बालिश, इर्शाळवाडीचं राजकारण नको; गिरीश महाजनांची टीका

माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर आमदार संग्राम जगताप यांना आव्हान देईल असा तगडा उमेदवार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे नव्हता. पण भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या युतीने नगर शहरातील राजकारण बदलले आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी अभिषेक कळमकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

हा कार्यकर्त्यांचा आततायीपणा, शिंदेच…; अजित पवारांच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गिरीश महाजन म्हणाले…

यावेळी बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले, मी शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. मी सध्या मुंबईत असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. पक्षाकडून दिलेली जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे मला सांगितले आहे. मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube