अहमदनगरच्या उड्डाणपुलावर युवकाचा मृत्यू; सहा महिन्यात तिसरा बळी

Untitled Design   2023 05 29T104047.666

Ahmednagar Flyover accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनावरील युवकाला स्टेट बँक चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या वर असलेल्या वळणावर जोराची धडक दिल्याचे समजते आहे. हा अपघात एवढा जबर होता की या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी तिसऱ्यांदा अपघात झाला आहे.

नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर नोव्हेंबरमध्ये प्रवासासाठी खुला करण्यात आला. मोठा तामझाम, आतिषबाजी करत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत तीन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या उड्डाणपुलावर गेल्या सहा महिन्यात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. आणि या सर्वामध्ये धक्कादायक बाब म्हणजे तिन्ही अपघात एकाच ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे .

चांदणी चौक परिसरातील वळणावर हे अपघात झाल्याचे आजवर समोर आले आहे. दरम्यान वाहतुकीचे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच वेगावरील मर्यादा पाळणे हे देखील वाहनधारकांचे काम आहे. मात्र सुसाट रित्या वाहन चालविणे व वेग नियंत्रण न झाल्याने अनेकदा अपघात घडत असतात. या घटनांबाबत माहित असताना देखील निष्काळजीपणे वाहने चालवली जात असल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us