अहमदनगरची विशेष ओळख असलेल्या वास्तू

अहमदनगरची विशेष ओळख असलेल्या वास्तू

Ahmednagar Foundation Day : जगात फार थोडी शहरं अशी आहेत की ज्यांच्या स्थापनेचा दिवस कुठेतरी इतिहासात नोंदविण्यात आला आहे. त्यातलंच एक शहर म्हणजे अहमदनगर. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ अशी ओळख असलेल्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. आज नगर शहराचा 533 वा वाढदिवस. म्हणजे शहर स्थापनेला आज तब्बल 533 वर्षे पूर्ण झालीत.

अशी झाली नगरची स्थापना
पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी उर्फ अहमद निजामशहाने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाला. या विजयाचे प्रतीक म्हणूनच भिंगारजवळ भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. हाच दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो.

अहमदनगर शहराची विशेष ओळख असलेल्या काही ठिकाणांविषयी आपण जाणून घेऊ
भुईकोट किल्ला

या किल्ल्याला 500 वर्षांचा इतिहास असून निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशाहाने शहर वसविण्यापूवी इ.स. 1490 मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यास 22 बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे आणि त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. विशेष म्हणजे इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला.

दमडी मशीद
भुईकोट किल्ल्यापासून जवळच असलेली ही अप्रतिम कॅलिग्राफी आणि आदर्श वास्तूरचना असलेली दमडी १५६७ मध्ये निजामशाहाचा सरदार शेरखान याने बांधली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना मजुरांनी दिलेली दमडी- दमडी (तेव्हाचे चलनी नाणे) साठवून एका फकिराने ही मशीद बांधली आहे, असे सांगितले जाते. मशिदीच्या आत समोरच्या भिंतीत संगमरवरी दगडावर कुराणातील वचन वेलबुट्टीसारखी कोरण्यात आली आहेत. भारतातील सर्वांत सुंदर मशिदींमध्ये या मशिदीची गणना होते. विदेशी पर्यटक आवर्जून येथे भेट देतात.

फराहबक्ष महाल
निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष देणारी ही वास्तू नगर-सोलापूर रस्त्यावर आहे. नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखली जाणारी ही सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. अप्रतिम सौंदर्य आणि उत्तम हवा यावरून या वास्तूचे नाव फराहबक्ष म्हणजे ‘सुख देणारा महाल’ असे ठेवण्यात आले. बुऱ्हाण निजामशहाचा सरदार चंगेझखान, न्यामतखान दख्खनवी यांनी हा महाल बांधला. तलावाच्या मध्यभागी असलेल्या या अष्टकोनी दुमजली महालाभोवती पूर्वी सुंदर उद्यान होते. याच महालाच्या आराखड्यावर ताजमहाल बांधल्याचे सांगण्यात येते.

हश्त-बेहश्त बाग
भिस्तबाग म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू एका तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आली आहे. १५०६ मध्ये अहमद निजामशाहाच्या काळात ही अष्टकोनी वास्तू बांधली. पिंपळगाव तलावातून तेथे पाणी आणले होते. तेथे बादशाहाच्या परिवारातील स्त्री-पुरुषांसाठी स्नानगृह होते. परिसरात गुलाबाचे उद्यान होते.

चाँदबिबी महाल
शहराच्या पूर्वेकडील डोंगर रांगेत ही वास्तू उभी आहे. शहरातून कोठूनही ही वास्तू दिसते. मुर्तूजा निजामशहाचा मंत्री सरदार सलाबतखान याची ही कबर आहे. पण ती चाँदबिबीचा महाल म्हणूनच ओळखली जाते. तीन मजली अष्टकोनी दगडी वास्तू आहे. निजामशाहीत ही वास्तू लष्करीदृष्ट्या महत्त्वाची मानली जाई.

कोटला 12 इमाम
उल्लेखनीय मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात. इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.

ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र
अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र, जर्मनीची साखळी नसलेली सायकल, तांत्रिक गणपती, संस्कृत– मराठी शब्दकोश, 200 फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची काही आकर्षणे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube