गावात चोरी झाली तर पोलिसांवर कारवाई करणार का ?; कॉपी केसच्या निर्णयावरून शिक्षक-प्रशासनात जुंपली
Ahmednagar News : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पद्धतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळं काॅपी केसवरून शिक्षक आणि प्रशासनातच जुंपल्याचे दिसून येत आहे.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाला या प्रश्नाबाबत नुकतीच भेट देऊन शिक्षण विभागाचे अधीक्षक सत्यजीत मच्छिंद्र यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब निवडुंगे, रामदास शिंदे, बद्रीनाथ शिंदे, अमोल ठाणगे, राहुल झावरे आदी उपस्थित होते.
वाचा : Cantonment Board Election : अहमदनगर छावणी परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर
सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा (SSC HSC Exam 2023) सुरू आहेत. शिक्षक भरती नसल्यामुळे बर्याच शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांवर शालेय कामकाज व बोर्ड परीक्षेचे अतिरिक्त काम दिलेले आहे. बोर्डाच्या परीक्षेत जर विद्यार्थी कॉपी करताना आढळला, तर पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एखाद्या गावात चोरी झाल्यास पोलीस प्रशासनावरच कारवाई करायची का ? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
पर्यवेक्षण करताना सर्व शिक्षक चोखपणे काम करत असतात. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी कॉपी केली, तर तो त्याचा दोष आहे. मात्र, त्यामध्ये शिक्षकांना जबाबदार धरुन कारवाई झाल्यास अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे उर्वरित पेपरचे सुपरव्हिजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.