उद्या विधानभवनात अक्षय कर्डिले यांचा शपथविधी; जनतेचा आमदार म्हणून नव्या पर्वाची सुरुवात

Akshay Kardile-आता संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी माझी असून हा मतदारसंघच माझे कुटुंब आहे.

  • Written By: Published:
Akshay Kardile

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन करणारे नवनिर्वाचित आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले(Akshay Kardile) उद्या मुंबईतील विधानभवनात आमदारपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीकडे संपूर्ण राहुरी मतदारसंघाचे लक्ष लागले असून, मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडणारे अक्षय कर्डिले यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या जनता दरबार उपक्रमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी, वीज, रस्ते, महसूल, आरोग्य, शिक्षण यांसह विविध प्रश्नांसाठी नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळेच पोटनिवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत भरघोस मतांनी विधानसभेत पाठविले. शपथविधीनंतर राहुरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना करणे, यावर आपला भर राहणार असल्याचे कर्डिले समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. उद्याचा शपथविधी हा केवळ एका आमदाराचा नसून राहुरीच्या विकासाच्या नव्या संकल्पनेचा प्रारंभ असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

अक्षय कर्डिले म्हणाले, की मतदारसंघाच्या विकासासाठी सज्ज आहे राहुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला भरभरून आशीर्वाद आणि विश्वास यामुळेच विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले, त्याच विचारांचा वारसा पुढे नेत प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध राहणार आहे. आता संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी माझी असून हा मतदारसंघच माझे कुटुंब आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करणार असल्याची भावना नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली.

follow us