Radhakrishna Vikhe Patil : विरोधक म्हणजे, “बाहेरुन किर्तन अन् आतून तमाशा”

Radhakrishna Vikhe Patil : विरोधक म्हणजे, “बाहेरुन किर्तन अन् आतून तमाशा”

अहमदनगर : विरोधकांच्या मोट बांधणीला अर्थ नाही, ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहता विरोधकांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, म्हणून हे एकत्र येत आहेत, असं म्हणतं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि शरद पवार, उद्धव ठाकरे भेटीवर टीका केली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (BJP Minister Radhakrishna Vikhe Patil criticized Congress, NCP And ShivSena (UBT)

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आपले भविष्य काय हि चिंता विरोधकांना सतावत आहे, म्हणून हे एकत्र येत आहेत. अन्यथा अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांविषयी काय उद्गार काढले होते आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे विरोधकांचे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात काँग्रेस मूठभर शिल्लक :

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षातूनच होणाऱ्या विरोधावर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांच्या विधानांवर बोलताना विखे पाटील म्हणाले, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. पण तसंही महाराष्ट्रात काँग्रेसला कुठलं स्थान आहे? काँग्रेस मूठभरच शिल्लक राहिली आहे. काँग्रेस नेते हे मंत्रिमंडळात सत्ता मिळावी म्हणून हापापलेले आहेत, मंत्र्यांना सगळं काही मिळालं. पण काँग्रेस कार्यकर्त्यांना काहीही मिळालं नाही, याबाबत कार्यकर्त्यांना विचारायला हवं असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

शिंदे गट – भाजपमध्ये कोणाताही वाद नाही :

शिंदे गट आणि भाजप यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याचे समजते. शिंदे गटाने भाजपकडे 22 जागांचीही मागणी केल्याची माहिती आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. जरी एखाद्या पक्षाचा नेता जागा वाटपाबाबत बोलत असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube