आमदार संग्राम जगतापांसह 19 जणांवर गुन्हा दाखल, कर्जत रास्ता रोको प्रकरण भोवलं
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना टार्गेट केले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या (Nagar) विटंबनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुक्यात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना टार्गेट केले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदू समाजातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप
विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप जगताप यांनी केला. पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला.
“मला टार्गेट केल्याने प्रश्न सुटणार नाही. मी नसलो तरी हे काम पुढे सुरूच राहील,” असे संग्राम जगताप यांनी म्हटले. दरम्यान, कर्जत रास्ता रोको प्रकरणी आमदार जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिल्याचेही जगताप यांनी सांगितलं.