लग्न ठाकरे गटाच्या नेत्याचं अन् जल्लोष शिंदेंचा
Eknath shinde : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा (maharashtra Political Crisis)निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या निकालाचं मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)स्वागत केलं आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांना अलर्टच्या राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे देवदर्शनाला नगर जिल्ह्यात
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबक रस्त्यावरील रिसॉर्टमधील लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी महाजनांनी भाषण केलं. आमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आणि महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चपराक बसली असून न्यायालयाने सरकारवर शिक्कामोर्तब केल्याचे माध्यमांना सांगितले आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम निर्णय दिला त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. त्यातच सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार दराडे यांच्या मुलाच्या लग्नाला आवर्जून हजेरी लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली होती. लग्न सोहळ्यामध्येच शिंदे समर्थकांनी आनंद साजरा केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे म्हणाले की, आज सत्याचा विजय झाला आहे. या निर्णयामुळे घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून सामान्यांच्या मनातील निर्णय न्यायालयाने दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.