काँग्रेसचा राज्यातील बडा नेता आयकरच्या रडारवर; 9 वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या सुतगिरणीवर छापेमारी
धुळे : धुळे ग्रामीणचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील आयकरच्या रडारवर आले आहेत. कुणाल पाटील अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मागील 24 तासांपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या सूतगिरणीचा ठेका गुजरात स्थित कंपनीला देण्यात आला असून त्या कंपनीच्या चौकशीसाठी आयकर विभागाचे पथक मोरणे येथे दाखल झाल्याची माहिती आहे. (Congress MLA Kunal Patil’s Jawahar Farmers’ Cooperative Sugar Mill raided by Income Tax Department)
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील मोरणे शिवारात जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी आहे. मागील 9 वर्षांपासून कुणाल पाटील हेच या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. याच ठिकाणी शनिवारी (30 सप्टेंबर) पहाटे आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली. मुंबई, पुणे आणि नागपूरमधील आयकर विभागाचे अधिकारी या पथकात असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी सुरक्षा रक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले होते. शिवाय लँडलाईन कट केली आहे.
आमदार कुणाल पाटील यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. सूतगिरणीवर कोणत्या तपास यंत्रणेने छापा टाकला, याची मला कल्पना नाही. सूतगिरणीमध्ये असलेली सर्वच संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असल्याने कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, सूतगिरणीचा ठेका गुजरात स्थित कंपनीला देण्यात आला असून त्या कंपनीच्या चौकशीसाठी आयकर विभागाचे पथक दाखल झाले असावे असा तर्क बांधला जात आहे.
शुक्रवारी नागपूरची जबाबदारी, शनिवारी सुतगिरणीवर छापा :
कुणाल पाटील यांना शुक्रवारीच अमरावती आणि नागपूर विभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यात बसवराज पाटील मुरुमकर यांना पश्चिम महाराष्ट्र, प्रणिती शिंदे यांना उत्तर महाराष्ट्र आणि आरिफ नसीम खान यांना कोकण, मराठवाडा विभागाचे प्रभारी पद देण्यात आले आहे. यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच कुणाल पाटील यांच्या सुतगिरणीवर छापा पडल्याने पुन्हा एकदा राजकीय हेतुने ही कारवाई झाल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.