‘नाट्य अभ्यासक्रम नगरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकेल’ – प्रा. जाधव यांचं प्रतिपादन…

Ahilyanagar News : नगरला विविध कलेचा समृद्ध वारसा आहे. विशेषतः नाट्यकला हा नगरच्या सांस्कृतिक समृद्धीचा महत्वाचा भाग आहे. अनेकांनी नाट्यकलेसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. अहिल्यानगरमधील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सुरू होत असलेला नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम नगरच्या सांस्कृतिक वैभवात महत्वाची भर टाकेल. नगरकरांनी त्यास भरभरून प्रतिसाद द्यावा, असे मत प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील प्राध्यापक यशराज जाधव यांनी व्यक्त केले.
राजकीय पक्ष जनतेला उत्तर द्यायला बांधिल; विधिमंडळात न्यायमूर्ती भूषण गवईंनी टोचले कान
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सुरू होत असलेला नाट्यशास्त्र या अभ्यासक्रमाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी नगर जिल्ह्याच्या नाट्य परंपरेची ओळख करून दिली. संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेची आणि कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
बुधवारी भारत बंदची हाक! 25 कोटी कर्मचारी उतरणार रस्त्यावर; बँकिंगसह अन्य सेवा होणार ठप्प
मध्यवर्ती नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतिश लोटके यांनी नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नाट्य चळवळीचा मागोवा घेतला. नाट्यशास्त्र विभाग व नाट्यसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नगरकरांची नाट्यकला शिकण्याची भूक हा अभ्यासक्रम पूर्ण करेल आणि हौशी नाट्यकलावंतांना शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा यावेळी बेडेकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, नवीन अभ्यासक्रम ग्रामीण भागात सुरू करून विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईत न जाता नगरसारख्या कमी खर्चीक शहरात चांगले शिक्षण मिळावे अशी संस्थेची अपेक्षा असते. याच भावनेतून नाट्यशास्त्र हा विषय सुरू केल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, निमाताई काटे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ. अनिल आठरे, नाट्यकर्मी पी. डी. कुलकर्णी, डॉ. श्याम शिंदे, सदानंद भणगे, प्रा. देवशीष शेडगे, रियाज पठाण, दीपक ओहोळ, भगवान राऊत, संजय लोळगे, अंजना पंडित, नंदकूमार आढाव, रवींद्र सातपुते, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. बापू चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा. अभिजीत गाजभिये यांनी मानले.