जनतेच्या प्रश्नांसाठी सुजय विखे मैदानात…जनता दरबाराच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू

Sujay Vikhe : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील काहीसे राजकीय विजनवासात गेल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत ते अॅक्टिव्ह झाले होते. जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यात विखे पिता-पुत्रांचा मोठा वाटा आहे. या निवडणुकीनंतर सुजय विखे अनेक राजकीय सभा, मेळावे, छोटेखानी कार्यक्रमांतून जनतेच्या संपर्कात आहेत. आता त्यांनी लोकसंपर्काची नवी मोहीम सुरू केली आहे ती म्हणजे जनता दरबार.
राहता तालुक्यातील खडकेवाके येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारासाठी अहिल्यानगर व परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली. प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्यावतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फुलांचा हार, शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
Sujay Vikhe : सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची योग्य ती दखल घेतली जाईल, तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिली.
सदरील जनता दरबारात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांवर भर देण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली भूमिका सकारात्मक राहील, असेही आश्वासन या दरम्यान उपस्थितांना दिले. या जनता दरबारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.