सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट… मोर्चेकऱ्यांवर ‘दगडफेक’

सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट… मोर्चेकऱ्यांवर ‘दगडफेक’

Hindu Samaj Morcha : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) मध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चाचे (Bhagwa Morcha) आयोजन केले होते. या मोर्चाला प्रतिसाद देत संगमनेरकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. संगमनेर शहर आणि परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सगळं काही सुरु असताना तालुक्यातील समनापूर गावात या मोर्चाला गालबोट लागले आहे. या मोर्चानंतर काहींकडून मोर्चेतून परतणाऱ्या नागरिकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक गाड्यांचं नुकसान झाले असून तालुक्यातील समनापूर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यामध्ये हिंदूंच्या सणांवर होणारे वारंवार हल्ले, लव्ह जिहाद प्रकरण, जोर्वे येथे हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या अनुषंगाने व्यापारी तसेच नागरिकांकडून या मोर्चाला मोठा प्रतिसाद देखील देण्यात आला होता. मात्र हे सुरु असताना या मोर्चाला गालबोट लागले आहे.

हा मोर्चा संपल्यानंतर काही नागरिक हे आपल्या घरी जात होते. हे मोर्चेकरी समनापूर गावात आले असता त्यांच्यावर एका गटाकडून दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याबाबतची माहिती समजताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी धाव घेतली. यातील एका जमावाला शांत करण्यात आले असून जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

मात्र ही घटना कशावरून घडली आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

दगडफेकीत मोठे नुकसान
मोर्चा शांतेतेमध्ये पार पडला व मोर्चेकरी घरी परत असताना यावेळी एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी हिंसक गटाकडून गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. तसेच अनेक घरांवर देखील यावेळी दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांवर कारवाई करावी अन्यथा येत्या काळात आणखी मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा मोर्चेकरांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube