Letsupp Special : अहमदनगर दक्षिणेत पुन्हा विखे विरुद्ध पवार; लंकेंच्या रुपात तगडा पहिलवान

Letsupp Special : अहमदनगर दक्षिणेत पुन्हा विखे विरुद्ध पवार; लंकेंच्या रुपात तगडा पहिलवान

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांची माफी मागून त्यांची साथ सोडली आहे. लंकेंनी आता लोकसभेसाठी तुतारी फुंकली आहे. लंकेंच्या रुपाने पहिल्यांदाच विखे कुटुंबाला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना तगडा पहिलवान मिळाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेंविरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत पक्की झाली आहे. पण ही लढत लंकेंविरुद्ध विखे नाही तर शरद पवार विरुद्ध विखे अशी लढत होईल. शरद पवार व विखे वाद काय आहेत. कुणाचे पारडे कसे जड आहे याची माहिती घेऊ या..

बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला होता. काँग्रेसमध्ये असलेले दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय दुश्मन झाले होते. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यशवंतराव गडाख हे तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

मोठी बातमी : निलेश लंकेंच्या हाती तुतारी ! आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात रिंगणात

शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. पुढे शरद पवारांना सुप्रिम कोर्टात दिलासा मिळाला. दोघांतील राजकीय वाद पुढे ही तसाच राहिला आहे. आता तो थेट विखेंची तिसरी पिढी सुजय विखेंपर्यंत आलाय. या खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असल्याचे बोलले जाते. त्यावरून ते अनेकदा बोलले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कुणाची किती ताकद

या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तीन मतदासंघात शरद पवारांचे आमदार आहेत. तर दोन भाजप आणि एक अजित पवार गटाचा आमदार आहे. यात राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ही लंकेंसाठी जमेची बाजू आहे. पण राहुरीत विखेंना मानणाराही मोठा वर्ग आहे. पारनेर-नगर मतदारसंघात स्वत: निलेश लंके हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांची ताकद आहे. तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार राहिलेले विजय औटी यांना मानणारा वर्ग आहे. ते लंकेंना किती आणि कशी मदत करतात हेही महत्त्वाचे आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, भाजपचे विश्वनाथ कोरडे असे स्थानिक राजकारणी विखेंबरोबर आहेत.

अहमदनगर शहरात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे विखेंबरोबर आहेत. तर माजी महापौर अभिषेक कळमकर व त्यांचे काका दादाभाऊ कळमकर हे लंकेंना ताकद देतील. ठाकरेंना मानणारा मोठा मतदार नगरमध्ये आहे. लंके हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे नगर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संपर्क आहे. त्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कर्जत व जामखेड. येथे रोहित पवार आमदार आहेत. त्यांची ताकद लंकेंना मिळेल. तर विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हे उघडपणे विखे पिता-पुत्रावर नाराजी व्यक्त करत होते. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकीत नाराजी दूर झाली. त्यामुळे विखेंसाठी राम शिंदे ही कामाला लागले आहेत.

मंत्री अन् आमदार ताटकळले पण, भेट होईना; CM शिंदे अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा

श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. त्यांचा फायदा होईल. या मतदारसंघात अजित पवार ताकदही मोठी आहे. कारण राजेंद्र नागवडे हे अजित पवारांवर बरोबर आहेत. तर स्थानिक नेते बाळासाहेब नाहाटांना अजितदादांना थेट जिल्हाध्यक्षची जबाबदारी दिलीय. त्यामुळे त्यांची मदत विखेंना चांगलीच होईल. या मतदारसंघात पाचपुतेंचे पुतणे हे साजन पाचपुते ठाकरे गटात आहेत. तर माजी आमदार राहुल जगतापांची ताकद ही लंकेच्या पाठीमागे आहेत. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. तर प्रताप ढाकणे हे शरद पवारांबरोबर आहेत. तर शेवगावचे चंद्रशेखर घुले हे तर अनेकदा अजितदादांबरोबर दिसले आहेत. त्यामुळे त्यांची मदत विखेंना होईल.

यात माजी आमदार व जिल्हा बँकचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले हा फक्टर महत्वाचा असणार आहे. नगर तालुका हा राहुरी, श्रीगोंदे, पारनेर या तीन मतदारसंघांना जोडलेला आहे. तालुक्यावर कर्डिलेंचे वर्चस्व आहे. ही विखेंनी एक जमेची बाजू आहे. एकंदरीत सध्या तरी कागदावर दोन्ही आमदारांची ताकद समप्रमाणात दिसत आहे.

दोन्ही उमेदवारांच्या फायद्याचे फॅक्टर  

विखे यांच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. जसा उत्तरेत त्यांचा लोकांनी व कार्यकर्त्यांचा थेट संपर्क आहेत. तसा दक्षिणेत त्यांचे जुने कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. ही यंत्रणा विखे वापरतात. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्याचा फायदा ते घेतील. पाच वर्षांत खासदार विखे यांनी अनेक रस्त्यांची कामे, शहरातील उड्डाणपूल, बायपास असे महत्वाचे काम केली आहे.

लंके फॅक्टर

सर्वसामान्य व्यक्तींना सहज भेटणारा, त्यांचे फोनवर काम करणारा आमदार म्हणून त्यांची इमेज झाली आहे. कोरोना काळात त्यांनी उघडलेले कोविड सेंटरमुळे ते राज्यात चर्चेत आले होते. हे कोविड सेंटर त्यांनी केवळ पारनेरपुरते मर्यादित न ठेवता पूर्ण जिल्ह्यातील रुग्ण येत होते. त्याचा फायदा लंके उठवतील.

बाळासाहेब थोरातांची मदत

दक्षिण मतदारसंघात काँग्रेसची ताकद आता काहीच राहिलेली नाही. थोरात यांना मानणारे कार्यकर्ते लंकेंना किती मदत करतील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. या मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवार ते श्रीमंत उमेदवार या पातळीवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न लंकेचा आहेत. त्यासाठी ते जनतेकडून निवडणूक निधी घेत आहेत. लोकसभा लढविण्याची घोषणा करताना नोट भी व्होट मी जनता देईल, अशी घोषणाच लंकेंनी केलीय. विखे फॅक्टर, भाजपची ताकद भेटणे एवढे सोपे नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे मतदारसंघात तुल्यबळ लढत होईल, हे तरी सध्याचे चित्र आहे. नगर लोकसभेचा डॉन कोण आहे ते मतदान आणि मतमोजणीच्या दिवशीच दिसेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज