Ahmednagar Name Change : आता अहिल्यादेवी होळकर नगर! CM शिंदेंची थेट घोषणा
Ahmednagar Name Change : नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर नाव देण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे जाहीर करून टाकले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मी एकत्रच निर्णय घेत असतो. आ. राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह आपली जी मागणी आहे. आपल्या मनातली जी इच्छा आहे. तो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मला व देवेंद्र फडणवीस यांना अभिमान आहे, असेही शिंदे म्हणाले.
Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, या नगरचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर देण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे. राजमाता होळकर यांचं कर्तृत्व हिमालया एवढं मोठे. त्यांचे नाव दिल्याने नगरचा मानदेखील हिमालयाएवढा होणार आहे. ज्यांनी येथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या त्यांच्या सरकारला वीस दिवसात घालविण्याचे काम आम्ही केलं, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांना लगावला.