कर्डिले चमत्कारिक, त्यांच्या टोपीखाली काय-काय दडलंय ? ; फडणवीसांनाही पडला प्रश्न
Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार चर्चा सुरू असतानाच असतानाच आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच कर्डिलेंच्या या कामगिरीचे कौतुक केले आणि कर्डिलेंच्या टोपीखाली काय काय दडलंय ? असा केलेला सवाल उपस्थित सगळ्यांनाच हसवून गेला.
हे सुद्धा वाचा : मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार
फडणवीस आज शेतकरी मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कर्जतमध्ये आले होते. यावेळी मेळाव्यातील भाषणात व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेताना त्यांनी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा अनोख्या पद्धतीने उल्लेख केला. त्यामुळे येथे जोरदार हास्यकल्लोळ उडाला.
फडणवीस म्हणाले, ज्यांनी नुकताच जिल्हा बँकेत चमत्कार घडवला तसे कर्डिले साहेब चमत्कार घडविण्यात फेमस आहेत असे कौतुकाचे शब्द उच्चारत त्यांच्या टोपीखाली काय काय दडलंय ? असा प्रश्नही केला. त्यांच्या या अनपेक्षित अशा प्रश्नाने कर्डिलेंसह व्यासपीठावर उपस्थितांसह सर्वच खळखळून हसले.
‘पाच रुपये फरक दिला, निम्मा संघांनी हडप केला.. राधाकृष्ण विखेंचा रोख कुणाकडे ?
तसे पाहिले तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संदर्भ यामागे होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संचालकांची मते फुटल्याने कर्डिलेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा पराभव करत अध्यक्षपद मिळवले.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्या सूचना आणि सहाकार्याने हा विजय मिळविल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज फडणवीस यांनी थेट जाहीर सभेत कर्डिले जिल्हा बँकेत चमत्कार घडविला असे सांगितले.
राम शिंदेंनाही दिले बळ
फडणवीस यांनी राम शिंदे यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, रामभाऊ तुमचं कामचं वेगळं आहे. अन्य पक्षांच्या सभात जितकी माणसे समोर बसलेली असतात तितकी माणसे तुम्ही मंचावरच आणून बसवतील. मी उलट होऊन इथेही एक सभा घेता येईल.
खरं म्हणजे भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. म्हणूनच राम शिंदे यांच्यासारखा एक प्राध्यापक जो जनसामान्यातून उभा राहिला तो आज मंत्रिपदापर्यंत पोहोचला हे फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकते, असे फडणवीस म्हणाले.