सावेडीकरांचा मनोज जरांगेंना भक्कम पाठिंबा; अजय बारस्करांचा केला निषेध
Ahmednagar News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर (Manoj Jarange) अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीका (Ajay Baraskar) केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर संतापाची लाट मराठा समाजात उसळली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने संपूर्ण सावेडी गावाने बारस्करांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव भक्कमपणे उभे असल्याचा एकमताने ठराव करण्यात आला.
नगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा सर्वानुमते सावेडी गावाच्यावतीने निषेध करण्यात आला. त्यांच्या वक्तव्याला सावेडी ग्रामस्थांचे अजिबात समर्थन नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारा अजय बारस्कर हा सावेडी गाव परिसरात राहत आहे. जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांचे सत्र सुरू केले आहे. तेव्हापासून नगर शहरासह बारस्कर राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.
अजय बारस्करांची भूमिका त्यांची वैयक्तिक आहे. त्यांच्या याच भूमिकेला विरोध असल्याचा दावा सावेडी ग्रामस्थ करत आहेत. सावेडी गावातील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारस्करांचा निषेध केला आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने अजय महाराज बारस्कर यांचा विरोध त्यांच्याच गावातून सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय
संपूर्ण सावेडी गावातील मराठा बांधव हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या लढाईला सदैव साथ देणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी ठराव केला. गावातील ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे अजय बारस्कर याच्या वक्तव्यांना पाठिंबा नाही त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र अहमदनगर येथील मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक कुमार वाकळे, रवींद्र बारस्कर, बबन बारस्कर, राजेंद्र वाकळे, यशदेव बारस्कर, सुरेश करपे, राजेंद्र काळे, रवींद्र वाकळे, सचिन बारस्कर, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते.