निवडणुकीत भाजपचा अदृश्य हात ? कोल्हेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं!

निवडणुकीत भाजपचा अदृश्य हात ? कोल्हेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं!

Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, या चर्चांचे खंडन करत त्यात काहीच तथ्य नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा गणेश कारखाना निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार विवेक कोल्हे यांनी सांगितले. निवडणुकीतील विजयानंतर लेट्सअप मराठीने कोल्हे यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त केली.

Ahmednagar Politics : विखे-कोल्हे संघर्ष पुढे काय वळण घेणार?

विखेंच्या वक्तव्याने दुःख झाले

शिर्डीतील एका भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते, की त्यांचं काय करायचं ते 2024 ला पाहू. मला त्याचं जास्त वाईट वाटलं. आमच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.

विखेंना नगरमध्येच अडकवण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी तुम्हाला उद्युक्त केले की तुम्ही विखेंविरोधात लढा यामध्ये कितपत तथ्य आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. कोल्हे म्हणाले, यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही. हा निर्णय मी सभासदांच्या आग्रहाखातर घेतला होता. भाजपमधून कोणतीही मदत आम्हाला झाली नाही. आम्ही व्यक्तिगत आमच्या पातळीवर हा निर्णय घेतला होता. पक्षश्रेष्ठींना त्याची पूर्वकल्पना असली पाहिजे कारण, आमच्या संघटनात्मक व्यक्तींना आम्ही तसा निरोप दिला होता.

राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत आमच्या विरोधात उमेदवारी केली. त्यांचे तीन टक्के मतदान असताना आम्ही त्यांना दोन जागा मार्केट कमिटीत दिल्या. राहाता बाजार समितीत आमचे दहा टक्के मतदान होते तरीसुद्धा मार्केट कमिटीत आमचा कुणाचाच विचार झाला नाही त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यात असंतोष होता. पुढील निवडणुकीत तुम्हाला सन्मानपूर्वक घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर सुद्धा ते पाळले गेले नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचा हा उद्रेक झाला होता, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

आता अभ्यास करूनच काय तो निर्णय घेऊ

निवडणुकीतील विजयानंतर आता कारखाना प्रवरेच्याच ताब्यात राहणार की कसे याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय यावरही कोल्हे यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, आठ वर्षे कारखाना त्यांच्या ताब्यात असताना शेतकऱ्यांना प्रवरा युनिट दोन नावाने बिले मिळाले. करार संपल्यानंतर एक वर्ष संचालक मंडळाने कारखाना चालवला त्यावेळेस सगळ्या सभासदांना गणेशच्या नावाने बिले मिळाली. त्यानंतर अचानक कारखान्याची निवडणूक जाहीर होते. निवडणुकी दरम्यान फॉर्म भरले जातात. ते बाद होत नाहीत. त्यानंतर माघारीच्या दोन ते चार दिवस आधी एक्स्टेंशन करार करून घेतला जातो. त्यात निश्चितपणे आचारसंहितेचा भंग दिसतो. यामध्ये सभासदांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. संचालक मंडळ अस्तित्वात नव्हतं. या अशा अनेक कायदेशीर बाबी यात आहेत. बेकायदेशीरपणे तो करार वाढवून घेतला गेला आहे. त्यामुळे आता आम्ही सविस्तर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ असा इशारा कोल्हे यांनी दिला.

काळेंनी मदत केली नाही याची खंतच

या निवडणुकीत काळे कुटुंबिय तुमच्यासोबत नव्हते का, या निवडणुकीत त्यांची मदत झाली का या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, राहत्याच्या सभेत थोरात साहेबांनी तसेच राहाता तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सभेत सांगितले होते. त्याला थोरात साहेबांनीही दुजोरा दिला होता की आमदार आशुतोष काळे आपल्या बरोबर आहेत. त्याबद्दल मी स्वतः त्यांचे आभार मानले होते. परंतु, कृतीतून तसे काही दिसले नाही. जाहीर सभेत मी प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर सभासदांनीच दिले. मदत झाली की नाही. पोलिंग बूथवर त्यांची कार्यकर्त्यांची फौज कुठल्या तंबूत होती हे लक्षात आले असेलच. त्यामुळे निश्चितपणाने त्यांनी मदत केली नाही याची आम्हाला खंत आहे. त्याचाच भाग म्हणून विखेंनी भाषणात सांगितले की जे आम्हाला आता मदत करतील. त्याची परतफेड विखे पाटील योग्य पद्धतीने करतील. तर ते शब्दप्रयोग यांच्यासाठीच होते असे मला वाटते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube