Shirdi Lok Sabha : शिर्डीसाठी आठवले मैदानात! उमेदवारीसाठी थेट मोदींनाच साकडे
Shirdi Lok Sabha : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. शिर्डी लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मागच्यावेळी शिर्डी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाला. मात्र आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची आहे, असे आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तरुणांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पीडितांची चौकशी करण्यासाठी मंत्री आठवले हे हरेगाव येथे आले होते. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, याआधी भाजप खासदार सुजय विखे यांनी जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल. त्याचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो आदेश देतील तोच खासदार होईल. जे कोणी उमेदवार या जागेसाठी इच्छुक असतील त्यांनी आपली इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त करावी. त्यांनतर मोदी यांचा जो काही आदेश येईल, तो आमच्यासाठी अंतिम असेल. त्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करू, असे सांगितले होते. त्यानंतर आठवले यांनी आपण शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोदींकडेच मागणी केल्याचे सांगितले.
Shirdi Loksabha : भाऊसाहेब वाकचौरेंच्या घरवापसीने शिर्डीचा आणखी ‘तिढा’
आठवले म्हणाले, माझी राज्यसभेची टर्म 2026 पर्यंत असली तरी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवून येथील भागासाठी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग करण्याचा माझा मानस आहे. मी कधीही अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ दिलेला नाही. परंतु, मागच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय अशी मजबूत युती असताना देखील माझा पराभव झाला.
मात्र गेल्या वेळी जरी माझा पराभव झाला असला तरी मात्र आज राज्यात महायुतीचे सरकार असून देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे शिर्डीतून आपल्याला पुन्हा संधी मिळावी अशी आपली मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. राज्यात आरपीआयशिवाय सत्ता मिळवणे शक्य नाही. त्यामुळे ते यावर योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वाकचौरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने तिढा वाढला
शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना भरली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभेचे राजकीय समीकरणे बदलले आहेत. या बदलत्या समीकरणामुळे मात्र महाविकास आघाडी, महायुतीसाठी ही जागा डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसतड आहे.
शिर्डी लोकसभेच्या तिकीटावरून विखेंचे थेट दिल्लीकडे बोट, आठवलेंचे काय होणार?
2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. या मतदारसंघात तीन वेळा काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीतील बडे नेते असले मतदारसंघात तीनही वेळेस शिवसेनेच्या तिकीटावर खासदार निवडून आला. राखीव झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांना पराभूत केले. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट काँग्रेससची वाट धरली. हा प्रवेश करण्यामागे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे होते.