मतदारसंघाच्या विकासाची सुजय विखेंची ग्वाही; राहता दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदारसंघाच्या विकासाची सुजय विखेंची ग्वाही; राहता दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Elections 2024 :  “विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,” असे भावनिक उद्गार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहाता येथे आयोजित दौऱ्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी राबियानगर, साईनगर, त्रिशूळ नगर, लोकरूची नगर, बागडे वस्ती या भागांत ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी रघुनाथ बोटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रचाराची दिशा देत, आगामी निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

विखे पाटील यांनी आगामी काळात शिर्डी येथे उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक हॉस्पिटलमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सांगून हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी राहाता शहरातील पाण्याच्या गंभीर समस्येवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे समाधान करण्यात यश आले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे गटार व्यवस्थेत असलेल्या समस्यांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि माजी नगराध्यक्षांच्या प्रशासनावरील त्रुटींवर टीका केली. तसेच डॉ. विखे पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर “त्यांचा डिझेलचा खर्च संगमनेरहून चालतो,” अशी खोचक टीका केली.

Sujay Vikhe : ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीचे ‘ते’ वृत्त चुकीचे, जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

सुजय विखे पुढे म्हणाले, महायुती सरकारच्या नेतृत्वात विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनांतील लाभ पोहोचवून त्यांना मदत करण्यात आली. लाईट बिलांमध्ये सवलत देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला. यामुळे शेतकरी बांधवांनी यंदाची दिवाळी आनंदाने साजरी केली.

महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसिंचन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सरकारने ग्रामीण जनतेच्या अडचणींना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवली आहे. महायुती सरकारच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात सर्वांगीण विकास साधला जात आहे, ज्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे, असे सुजय विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube