‘माश्यांमुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर, नियमित खाल्यास बाईमाणूस पण चिकनी दिसते : मंत्री गावितांचं वक्तव्य
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा सल्ला शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात दिला. धुळे येथील मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होत्या. त्यांच्या या अजब सल्ल्याची सध्या राज्यभरात चर्चा होतं आहे.
‘डोळ्यांना माशाचा फायदा होतो’
विजय कुमार गावित म्हणाले मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात, डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. कोणी ऐश्वर्या राय बघितली का? ऐश्वर्या राय ही बेंगलोरमध्ये समुद्राच्या किनारी राहायची. ती दररोज मासे खायची, तिचे डोळे बघितले की नाही, तसे तुमचे पण होणार.
माश्यांमुळे आपली जी स्कीन असते, कांती असते, चांगली दिसते, त्यात ऑईल असते, तेल असते, त्यामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची स्कीन चांगली दिसते, असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ते भाषण करत असतानाही अनेकांनी अस्वस्थता व्यक्त केली. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे.
कोण आहेत विजयकुमार गावित?
विजयकुमार गावित हे नंदुरबारचे भाजप आमदार असून सध्या आदिवासी विकास मंत्री आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते मात्र 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आजवर सातवेळा मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची कारकीर्द डागाळली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने गावित यांना आदिवासी कल्याण विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री आणि आदिवासी कल्याण विभागांतर्गत मंडळाचे पदसिद्ध प्रमुख असताना टेंडरशिवाय कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केल्याचा आरोप 2017 मध्ये त्यांच्यावर सिद्ध झाला होता. चौकशी समितीने याबाबतचा अहवाल जानेवारी 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केला आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
दरम्यान, डॉ. विजयकुमार गावित यांच्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटूंबीय देखील राजकारणात सक्रिय आहे. त्यांची मुलगी डॉ. हिना गावित या नंदुरबारच्या भाजप खासदार आहेत. तर दुसरी कन्या सुप्रिया आणि पत्नी कुमुदिनी गाविता या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत. कुमुदिनी गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाही राहिल्या आहेत. इतकेच नाही तर त्यांचा मुलगाही जिल्हा परिषद निवडणुकीत उभा होता. पण कोपर्ली गटाच्या पोटनिवडणुकीत तो पराभूत झाला आहे.
याशिवाय गावित यांचे भाऊ प्रकाश गावित हे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. तर त्यांचे बंधू शरद गावित हे माजी आमदार असून शरद गावित यांचा मुलगा प्रकाश गावित हा देखील उमेदवार होता. विजयकुमार गावित यांचे तिसरे भाऊ राजेंद्र गावित हे भाजपचे नेते असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आहे. 2019 मध्ये तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. पण यामुळे संपूर्ण गावित कुटुंबीय राजकारणात सक्रिय असून प्रत्येकाकडे एखादे पद असल्याचे दिसून येते.