तरुण सामाजिक कार्यकर्ता ते संघर्षशील योद्धा; बबनराव ढाकणेंचा प्रेरणादायक प्रवास

तरुण सामाजिक कार्यकर्ता ते संघर्षशील योद्धा; बबनराव ढाकणेंचा प्रेरणादायक प्रवास

Babanrao Dhakne : नगर जिल्ह्याच्या राजकारणात संघर्षशील नेता अशी ओळख असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय 87) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या संघर्षाचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना जनमानसातून व्यक्त केल्या जात आहेत. बबनराव ढाकणे यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत त्यांची जनतेशी नाळ कायमच जोडलेली राहिली. राजकारण असो की समाजकारण त्यांनी नेहमीच सर्वसामान्य, कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवले. म्हणूनच त्यांचे राजकारणही समाजाच्या हिताचेच राहिले. शिक्षण, राजकीय वाटचाल, समाजकारण या सगळ्याच क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. त्यांच्या या वाटचालीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा..

शिक्षणातच राष्ट्रप्रेम अन् समाजकारणाचे संस्कार 

जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत बबनरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण अकोले येथे १९४३ ते १९४७ या कालखंडात झाले. २२ जून १९४५ रोजी हिंद वसतिगृह ही बोर्डिंग सुरु केलेली होती. याच वसतिगृहात बबनरावांना पुढिल शिक्षणाच्या सोयी करीता शहरात दाखल करण्यात आले. इ.स. १९४७ ते १९५१ या कालखंडात बबनरावांचे पाचवी ते आठवी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले. पाचवीचे शिक्षण पाथर्डी मुलांची मराठी शाळा येथे झाले. काही काळ पुणे व नगर येथेही त्यांना शिक्षणाकरीता वसतिगृहात रहावे लागले. पुढे काकासाहेब गाडगीळ यांनी पुणे येथे शिक्षणाची व्यवस्था केली.

राजकीय व सामाजिक कार्याचा प्रारंभ

१ जानेवारी १९५२ रोजी देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव निऱ्हाळी यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग बबनराव ढाकणे यांनी घेतला. ऑक्टोबर १९५२ मध्ये जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. १४ ऑक्टोबर १९५५ रोजी वयाच्या सतराव्या वर्षी गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या तुकडीत सहभाग घेतला. नगर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा व पहिला सत्याग्रही होण्याचा मान त्यांना मिळाला. सत्याग्रही तुकडीवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात बबनरावांचा हात मोडला.

१९५५ ते १९५७ काळात एक तरुण सामाजिक कार्यकर्ता म्हणुन तालुक्यात स्वतंत्र ओळख बबनरावांनी निर्माण केली. सन १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारकार्यात सक्रिय झाल्यानंतर शिक्षण आठवीनंतर सोडून दिले.

राजकीय वाटचाल

८ एप्रिल १९५९ रोजी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या ‘व्हिलेज बेंच कमिटी’ अकोले यावर अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९६० मध्ये वडिलांनी स्थापन केलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ४ जून १९६२ रोजी प्रथमच स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र या निवडणुकीत जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन लक्ष्मण हेमराज पालवे यांच्याकडून १५९ मतांनी बबनराव ढाकणे यांना पराभव स्वीकारावा लागला.

1967 मध्ये पहिल्यांदा झेडपी सदस्य अन् काँग्रेसचा राजीनामा  

१९६२ मध्ये पाथर्डी तालुका सहकारी सुपरवायमिंग युनियनचे प्रेसिडेंट निवडणूकीमध्ये विजय मिळाला. पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी-विक्री सहकारी संघ संचालकपदी निवड झाली. १ जून १९६७ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातून काँग्रेस पक्षाच्यावतीने एकमेव उमेदवार म्हणून विजयी. जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा निवड. २० नोव्हेंबर १९६७ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य म्हणून निवड. १९ जानेवारी १९६९ काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी, दडपशाहीस कंटाळून पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग त्यांनी केला.

१९७२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ग.रा. म्हस्के (बंडखोर कॉंग्रेस) यांच्या विजयात सिंहाचा वाटा बबनरावांनी उचलला. २ जून १९७२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातून स्थानिक जनता आघाडीचे उमेदवार म्हणून विजयी. या विजयानंतर दुसऱ्यांदा जिल्हा परिषद होण्याची संधी त्यांना मिळाली.

आमदार ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास 

विधानसभेच्या निवडणुका १९७८ मध्ये झाल्या. या निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार १३४ मते प्राप्त होऊन विजयी झाले. या निवडणुकीतील विजयामुळे स्व. बबनराव ढाकणे पहिल्यांदाच आमदार म्हणून राज्याच्या विधिमंडळात पोहोचले. २ ऑगस्ट १९७८ रोजी पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. २१ डिसेंबर १९७९ रोजी पुलोद मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले. ७ मार्च १९७९ रोजी महाराष्ट्र जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवडणुकीद्वारे बहुमताने निवड त्यांची निवड करण्यात आली.

1985 मध्ये साधली आमदारकीची हॅट्रिक 

६ मार्च १९८५ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी. २७ नोव्हेंबर १९८७ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती (सिनेटवर) निवडणूकीमधून निवड. ३० जुलै १९८८ रोजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड. २७ नोव्हेंबर १९८९ रोजी राम मंदिर आणि बोफोर्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड जिल्हा लोकसभा मतदार संघातून जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना विजय मिळाला.

खासदार अन् थेट केंद्रीय मंत्री 

चंद्रशेखर मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे उर्जाराज्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत पाथर्डी येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ८ जुलै १९९४ रोजी पुन्हा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १६ सप्टेंबर १९९४ रोजी शरद पवार मंत्रीमंडळात महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा कार्यभार देण्यात आला. १९९९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. काँग्रेस पक्षाचा त्याग करून शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पाथर्डी विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणूकीत पराभूत झाले. ८ एप्रिल २००१ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. सन २००४ पासून स्व. बबनराव ढाकणे पक्षीय राजकारणापासून अलिप्तच राहिले.

समाजकारणातून घडलं संघर्षशील नेतृत्व

८ जुलै १९६८ रोजी पाथर्डी तालुक्याच्या रस्ते, वीज, जलसिंचन प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली व सभागृहात उडी घेण्याचा प्रयत्न. सरकारच्या निषेधाच्या घोषणाही त्यांनी दिल्या. ९ जुलै १९६८ मध्ये विधानसभा सभागृहात पत्रके भिरकावली प्रकरणी विशेष हक्कभंग समितीने त्यांना सात दिवसाच्या कैदेची शिक्षेची शिफारस केली होती. यावर विधानसभा सभागृहात तब्बल तीन तास वादळी चर्चा झाली होती. अखेर सात दिवसाच्या कैदेच्या शिक्षेवर विधानसभा सभागृहाचे शिक्कामोर्तब झाले.

१५ जुलै १९६८ रोजी मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर पाथर्डी शहरात अभूतपूर्व सत्कार व मिरवणूक काढण्यात आली होती. १९६९ ते १९८७ या काळात मुळा धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष (वांबोरी चारी आंदोलन) केला. १९६७ पासुन प्रत्यक्ष साखर कारखान्यांवर जाऊन उसतोड मजुरांचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. १९७० मध्ये राज्यातील उसतोड मजुरांचा पहिला संप घडवून आणला.१९७३-७४ मध्ये केलेल्या संपामुळे राज्य शासनास याप्रश्नी शंकरराव पाटील समिती नेमावी लागली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube