टुकार मुलगा अन् त्याचा बाप; मंगेश चव्हाणांनी गोष्ट सांगत आमदार किशोर पाटलांना डिवचलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांच्यातील वाद चिघळला. बाप-लेकाची गोष्ट सांगत मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटलांना डिवचले.
Mangesh Chavan On Kishor Patil : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon District Bank Election) निवडणुकीतून भाजप व शिवसेनेच्या आमदारात वाद उफाळून आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) आणि शिवसेना आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्यातील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक टीकेपर्यंत गेलाय. जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून आलेले सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीका केलीय. चव्हाण यांनी आता थेट किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. एका गावातील बाप-लेकाची दोन मिनिटांची गोष्ट सांगत त्यांनी पाटील पिता-पुत्रांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
सुमितच्या वक्तव्यावरून वाद पेटला
सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राजकीय वातावरण तापले होते. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सुमित यांच्याशी थेट वाद घालण्याऐवजी त्यांचे वडील किशोर पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे म्हटले होते. मात्र, किशोर पाटील यांनी आपल्या मुलाच्या वक्तव्याची पाठराखण केल्याचे समोर आल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलाच्या वक्तव्याला वडिलांनी समर्थन देणे चुकीचे असल्याचे म्हणत चव्हाण यांनी किशोर पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली. याचवेळी त्यांनी एक गोष्ट सांगून या वादाला आणखी तिखट वळण दिले.
‘टुकार मुलगा अन् त्याचा बाप’, गोष्टीतून साधला निशाणा
मंगेश चव्हाण म्हणाले, “मी एक गोष्ट ऐकली आहे. त्या गोष्टीचे आणि या प्रकरणाचे किती साधर्म्य आहे, याचा तुम्हीच अंदाज लावा.”
यानंतर त्यांनी गावातील एका टुकार मुलाची गोष्ट सांगितली. गावातील लोक त्या मुलाच्या सततच्या उपद्रवाला कंटाळले होते. त्यामुळे गावातील काही प्रमुख मंडळी मुलाच्या वडिलांकडे जाऊन त्याला समज देण्याचा निर्णय घेतात. मात्र, वडिलांकडे पोहोचल्यानंतर त्यांना घराच्या छतावर उभे राहून लघुशंका करतानाचे चित्र दिसते. खाण तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा, असे म्हणत त्यांनी किशोर पाटील यांना लक्ष्य केले. या वक्तव्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांच्यातील वाद चिघळला आहे. बाप-लेकाची गोष्ट सांगत मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील आणि सुमित पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.