Maratha Reservation आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कोपर्डीकरांचं उपोषण

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थ उपोषणास बसले आहे. तसेच या ग्रामस्थांनी जालन्यात उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील कोपर्डी येथे आज सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने भैरवनाथ मंदिर येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं !
विशेष म्हणजे या मराठा क्रांती मोर्चाची स्थापना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या गावांमधून झाली होती. त्यानंतर राज्यभरात विशाल असे लाखोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते. मात्र पुन्हा एकदा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात समाज उपोषणास बसला असता या उपोषणकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून लाठी चार्ज करण्यात आला. तसेच गोळीबार करण्यात आला याच्या निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोपर्डी येथे ग्रामस्थांच्या वतीने आज मंगळवारपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी देखील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत एका दिवसात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी भूमिका मांडली आहे. मात्र त्यात कायदेशीर अडचणी आहेत. असं एका दिवसात अध्यादेश काढता येत नाही. तो कोर्टात टिकणार नाही. अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यसरकारच्या मंत्रिमंडळ समितीचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.