कोपरगाव शहरालगत साडेचारशे एकरावर होणार एमआयडीसी: आशुतोष काळे यांची माहिती
कोपरगावः कोपरगाव शहरानजीक असलेली जमीन एमआयडीसीकडे (MIDC) वर्ग करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, अशी मागणी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी 433 एकर जागा विनामूल्य देण्याची जाहीर घोषणा करून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील एमआयडीसी उभारण्याला हिरवा कंदील देवून कोपरगावला एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. कोपरगाव शहरालगतच्या एकर जागेवर एमआयडीसी होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावळीविहिर-सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन समारंभ झाला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्षस्थानी होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाचा लेखाजोखा मांडतांना उद्योग व्यवसायाच्या देखील समस्या मांडून त्यांनी कोपरगाव मतदार संघातील मूलभूत सुविधा बरोबरच रोजगार निर्मिती व व्यावसायिकांना चांगल्या सुविधा मिळून मोठे उत्पादन वाढीसाठी जागा कमी पडत असल्याचे उपस्थित मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सोयी सुविधा उपलब्ध होत नसून या समस्या सोडविण्यासाठी कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची 71.75 हेक्टर, डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्मची मालकीची 86.40 हेक्टर व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मचे मालकीची 15.19 हेक्टर अशी एकूण 173 हेक्टर (433 एकर) जागा उपलब्ध आहे. ही जागा एमआयडीसीकडे वर्ग केल्यास व्यावसायिकांचा जागेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्याची घोषणा करावी अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे व्यक्त केली. त्या मागणीचा धागा पकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी 433 एकर जागा विनामूल्य देण्याचे जाहीर करून लवकरच मंजुरी देणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळेंना दिली.
उदय सामंत म्हणाले, महसूलमंत्र्यांनी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी देखील कोपरगावात एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. हा कोपरगाव मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटल्यामुळे व कोपरगाव शहरात येणाऱ्या बहुतांश रस्त्यांचा विकास झाल्यामुळे कोपरगाव शहरालगत 433 एकर जागेवर एमआयडीसी होवून मतदार संघातील रोजगार वाढीचा प्रश्न यानिमित्ताने निकाली काढण्यात आमदार आशुतोष काळे यांना यश आले आहे.
एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो
आमदार आशुतोष काळे लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय हुशार आहे. ते माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत. कोणत्या वेळी काय मागणी करायची हे त्यांना चांगले माहिती आहे. जागा विखे पाटलांच्या विभागाची आहे, जी मागणी केली आहे ते दोन्ही मंत्री कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महसूलमंत्री विखे यांनी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो, असे उद्योगमंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे.