रविवारी धावणार नगरकर, नगर रायझिंग मॅरेथॉनचे आयोजन
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा यंदा रविवारी (ता. 5) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप जोशी यांनी दिली.
ही मॅरेथॉन स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 4 किलोमीटर अशा तीन प्रकारांत होईल. स्पर्धेची सुरुवात भिंगारमधील महेश पार्क येथून होईल तर समारोप अहमदनगर क्लब येथे होणार आहे.
या स्पर्धेत 21 किलोमीटरच्या रुटमध्ये महेश पार्क, चांदबिबी महाल मार्गे अहमदनगर क्लब, 10 किलोमीटरच्या रुटमधे अहमदनगर क्लबपासून पाथर्डी रस्त्यावरील मदरसा जवळील मारुती मंदिर मार्ग अहमदनगर क्लब तर 4 किलोमीटरच्या रुटमध्ये अहमदनगर क्लबपासून नगर तालुका पोलिस ठाणे मार्गे पुन्हा अहमदनगर क्लबपर्यंत राहील. या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांची किट शनिवारी (ता. 4) सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत अहमदनगर क्लब येथे मिळणार आहे. या किटमध्ये टी शर्ट, चेस नंबर व भेट वस्तूंचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, बेगॉस, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स, चितळे बंधू, मित्तल ऑप्टिक्स, हेमराज केटर्स हे सह प्रायोजक आहेत.