अहमदनगर जिल्हा बँकेत पुन्हा पिसाळ पॅटर्न; पालकमंत्री विखेंची ताकद वाढली…
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank)निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushn Vikhe Patil)राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)ज्येष्ठ नेते अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देत अंबादास पिसाळ (Ambadas Pisal) यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न आज जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे. बँकेत झालेल्या आजच्या विशेष सभेत चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile)यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं निवडणुकीत चुरस निर्माण झाली. राष्ट्रवादीकडं (NCP)सर्वाधिक नऊ, काँग्रेसकडं (Congress)तीन आणि विखे गट (Vikhe Group)व भाजपकडं (BJP)प्रत्येकी तीन तर शिवसेना पुरस्कृतकडं एक संचालक आहे. असं असतानाही महाविकास आघाडीचा उमेदवाराला पराभव झाला आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मतं फुटल्याचं दिसतंय. या सर्व घडामोडींवरुन आता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद वाढल्याचं दिसून येतंय.
24 फेब्रुवारीला बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या निवडणुकीबाबतचा प्रस्ताव सहकार निवडणूक प्राधिकरणाला पाठवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज ही निवड प्रक्रिया झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे काल (मंगळवारी) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते त्याचवेळी झालेल्या बैठकीनंतर घुले यांचं नाव निश्चित समजलं जात होतं. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं होतं.
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीकडं बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिलं आहे. कर्डिलेंनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला आहे.
विखेंचा पिसाळ पॅटर्न
जिल्हा सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विखे गटाचे अंबादास पिसाळ व काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके एकमेकांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीसाठी मतदारांना महाविकास आघाडीने बारामतीची सफर घडविली होती. मतदारांना मतदानाच्या दिवशी बसमधून थेट मतदान केंद्रावर आणलं होतं. महाविकास आघाडीचे साळुंके हेच विजयी होणार असा विश्वास अजित पवारही व्यक्त करत होते.
मतमोजणी नंतरचा निकाल वेगळाच होता. अंबादास पिसाळ एका मतानं विजयी झाले होते. हा विजय कसा मिळविला याचा किस्सा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत नगरपंचायतच्या निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितला होता. तोच पॅटर्न पुन्हा जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळाला, अशी चर्चा आहे.
घुलेंच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
आज सकाळपासूनच भेंडा (ता. नेवासा) येथील मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात घुले समर्थक जल्लोषाच्या तयारीत होते. सोशल मीडियावरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिनविरोध निवडीच्या पोस्ट टाकल्या मात्र शेवटच्या क्षणी कर्डिलेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि घुलेंचा पराभव केला. त्यामुळं घुले कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.