Accident News : सत्यजित तांबेंचा पाठीराखा हरपला; मानस पगार यांचे अपघाती निधन

WhatsApp Image 2023 02 02 At 11.10.40 AM

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र निकालापूर्वीच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांच्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांचा पाठीराखा समजले जाणारे तसेच निकटवर्तीय नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांचे निधन झाले आहे.


आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार होता. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना अपघात घडला. पगार यांना उपचारासाठी तातडीने नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच मानस यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणारे नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात होते. यातच या निवडणुकीमध्ये पगार यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली होती. यातच पगार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने तांबे यांना धक्का बसला आहे.

तांबे यांनी ट्विटद्वारे आपला सहकारी असलेला मानस पगार याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तांबे म्हणाले, भावपूर्ण श्रद्धांजली, माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. दरम्यान फेसबुक, ट्विटरवर अनेकजण मानस पगारच्या अपघाती निधनाबाबत दुःख व्यक्त करत आहेत.

Tags

follow us