आजोबा चोरले म्हणणं म्हणजे हा मनाचा कोतेपणा, मंत्री भुसेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नाशिक : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिकच्या एका कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) येऊन लढतो, असे खुले आव्हान देत आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं. दरम्यान, मंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाला साधला.
आदित्य यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देतांना दादा भुसे म्हणाले, मला आदित्य ठाकरेंची कीव येते. आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनीसुध्दा आदित्य ठाकरेंना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. उगाच काहीही बोलण्याला अर्थ नसतो. गेल्या अनेक वर्षापासून राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. त्यावर चर्चा केली पाहीजे. मात्र त्याच्यावर हे कोणी बोलत नाही. या सगळ्या गोष्टींना आता लोक विटल्याचं भुसेंनी सांगितलं.
दरम्यान, शिंदे सरकारवर टीका करतांना आदित्य ठाकरे म्हणाले, जनतेचा प्रचंड उत्साह म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातील अंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जे केले ते महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत निष्ठेला महत्त्व आहे. गद्दारीला नाही. त्याचे परिणाम शिंदे व त्यांचे बंडखोर रोज अनुभवत आहेत. त्यामुळे ते धास्तावले आहेत. शिवाय, बाळासाहेब ठाकरे हे शिंदे गटाने चोरले असा आरोपही आदित्य यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचाही भुसे यांनी खरपूस समाचार घेतला. आदित्य यांच्या टीकेविषयी बोलतांना मंत्री म्हणाले, सरकारविषयी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, या टीकेमुळं सरकारला कोणताही धोका नाही, लोकांना ठाऊक आहे की, सरकार चांगलं काम करते. जनतेचा विचार करून हे सरकार काम करत आहे. राहिला प्रश्न बाळासाहेबांचा. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष आहेत. ते एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत, बाळासाहेब ठाकरेंना चोरले असा आरोप करणं हा आदित्य यांच्या मनाचा कोतेपणा असल्याचं भुसे यांनी सांगितलं.