17 गोण्या कांदा विकून हातात आले अवघे 52 रुपये!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’
Onion, Only 52 Rupees In Hand : तीन महिने कष्ट करून वाढवलेला कांदा काढून बाजार समितीत विकण्यासाठी आणला. मात्र एक रुपया भाव मिळाल्याने 17 कांदा गोण्यांचे हातात अवघे 52 रुपये पडले. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघाला नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. एवढ्या कष्टाने पिकुनही पदरात काहीच पडत नसल्याने आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नगर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गारपीट व वादळी वार्यासह होत असलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेले. त्यातच काढणीला आलेला कांदा शेतकरी काढून बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, कांद्याचे भाव 300 ते 400 रुपयांपर्यंत असल्याने शेतकर्यांच्या हातात नाममात्र पैसे मिळत आहेत. त्यातच अनेक शेतकर्यांचा कांदा गारपीट, वादळी वार्यासह झालेल्या पावसाने खराब झाला आहे.
श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया…
नगर तालुयातील खडकी येथील शेतकरी गोवर्धन आप्पासाहेब वाडेकर यांनी 17 गोण्या कांदा गुरुवारी (दि. 13) नेप्ती उपबाजार समिती, अहमदनगर येथे विक्रीसाठी आणला होता. भाडे, हमाली, मापाई व इतर खर्च वजा जाता त्यांच्या हातात 52 रुपयांची कांदा पट्टी आडत्याने टेकवली. कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भावच नसल्याने काही शेतकर्यांनी ट्रक्टर फिरवला आहे.
आशेपाटी काही शेतकरी कांदा बाजार आणत आहेत. परंतु, त्यांच्याही पदरात काही पडत नाही. दरम्यान, एकीकडे कांद्याला बाजार नाही आणि दुसरीकडे सरकारने प्रतिक्विटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु, जाचक अटींमुळे ते शेतकर्यांच्या पदरात पडेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरीही दुहेरी संकटात सापडला आहे.