अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार शरद पवारांचा फोटो; अजितदादांच्या पदाधिकाऱ्याला खास परवानगी
मित्राच्या मुलाच्या नात्याने मला तुमचा फोटो लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही संजय पावर यांनी पत्रामध्ये केली.
जळगाव : ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी (NCP) ही महायुतीमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना फेटाळून लावले. पण आता जळगामधूनही एक अशीच बातमी आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन त्यांचा फोटो बॅनरवर वापरण्याची रितसर परवानगी घेतली आहे. तसेच शरद पवारांनी फोटो वापरण्याची परवानगी दिल्याचे पत्र संजय पवारांनी माध्यमांना दाखवले आहे. त्यामुळे आता संजय पवार यांच्या बॅनरवर अजित पवारांसह शरद पवारांचाही फोटो लावण्यात येणार आहे.
अजितदादा महायुती सोबत गेले असले तरी शरद पवार यांचा फोटो ते कायम वापरत. पण शरद पवारांनी फोटो न लावण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांचा फोटो वापरणे बंद झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजही त्यांच्या भाषणाची सुरुवात वंदणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अशी करतात. तर एकनाथ शिंदे सुद्धा बाळासाहेबांना वंदनीय मानतात, असा उल्लेख शरद पवारांना दिलेल्या पत्रामध्ये संजय पवारांनी केला. तसेच माझे वडील मुरलीधर अण्णा पवार हे आपले सहकारी मित्र होते. मित्राच्या मुलाच्या नात्याने मला तुमचा फोटो लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही संजय पावर यांनी पत्रामध्ये केली.
त्यानंतर शरद पवारांनी संजय पवारांना फोटो वापरण्याची परवानगी दिल्याने अजित पवार गटातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार आणि खासदार यांनाही शरद पवार परवानगी देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देखील शरद पवारांना पत्र लिहून त्यांचा फोटो लावण्याची परवानगी मागणार आहेत, असे संजय पवार म्हणाले. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांना उधान मिळत आहे.